मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

वायूसेनेची कामगिरी

      भारतीय लष्करी इतिहासात आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा आहे. वायूसेनेने पहाटे साडेतीनच्या सुमारास हवाई हल्ले करून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी संघटनांची ठाणी, दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक यांचा खात्मा करून टाकला. आज सकाळी ही बातमी आली आणि देशभरातील वातावरण एकदम बदलून गेले. बारा दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यात सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला करून पाकने आगळीक केली होती. यात साठहून अधिक जवान शहीद झाले होते.‌ या पाश्वभूमीवर भारतीय लष्कर भूमिका घेणे अपेक्षित होते. त्यानुसार हवाई दलाने पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून आपली लष्करी सिध्दता संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. आजची ही‌ कामगिरी अभिमानास्पद आहे.

     भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या सत्तर वर्षात तीन युध्दे झाली. या तीनही युध्दात भारतीय सैन्य आणि ताकद जगाला दिसली आहे. विशेषत: 1971च्या बांग्लायुद्धात पाकने सपाटून मार खाल्ला. यानंतर छुप्या युद्धाचा आधार घेत दहशवादी संघटना मार्फत भारता विरुद्ध युद्ध सुरू ठेवले. 1980 नंतर सातत्याने हे उद्योग पाक करत आले . यास पाक लष्कराची मोठी साथ मिळाली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना शेफारुन गेल्या आहेत. पाक मध्ये मुलकी प्रशासन हे नावापुरते राहिले आहे. सतत लष्करी बंड आणि हुकुमशाह हे पाक मध्ये पाचवीला पुजले आहेत. पाकमध्ये  लोकशाही प्रक्रिया उभी राहू शकलेली नाही. सध्या ईम्रान खान हे सत्तेत आहेत, ते  ही लष्कर प्रभावाखाली वावरताना दिसत आहेत. त्यांच्याकडून दहशतवादी संघटनांचा बंदोबस्त होणार नाही. त्यामुळे अशा संघटनांचा उन्माद वाढत जाईल. पाकमधील सामान्य लोक हे अंतर्गत आणि बाह्य गोष्टींना कावून गेले आहेत. ते  भविष्य बदलू शकतात. यातून अंतर्गत यादवीची शक्यता नाकारता येत नाही. भारताने याचा  सखोल अभ्यास करून योग्य भूमिका घेणे उचित होईल. 

    आजच्या वायुसेनेच्या कारवाई नंतर पाक आणि तेथील दहशतवादी संघटना या अधिक आक्रमक बनतील. त्यांना चुचकारण्यासाठी पाक मधील राज्यकर्ते कोणतेही धाडसी पाऊल उचलू शकतात आणि तो आजपर्यंतचा बोलका इतिहास  आहे. आपल्याकडे निवडणुका येऊ घातल्या आहेत. आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राफेलचा मुद्दा राजकीय रिगणात आलेला आहे. भाजप- कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकावर राळ उडवित आहेत. या परिस्थितीत सामुहिक सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे महत्व असाधारण आहे. हा राजकारणाचा मुद्दा होऊ नये.  हे भान सांभाळून या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. विशेषत: समाज माध्यमांचा काळजीपूर्वक वापर व्हावा. 

डॉ. संजय रत्नपारखी.



गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

मातृभाषेतून शिक्षण: एक आठवण

मातृभाषेतून शिक्षण हा आपल्या पिढीचा मोठा ठेवा आहे. आपल्या पिढीतील बहुतांश लोक हे न.पा, जि.प, किंवा स्थानिक शाळेत शिकलेले आहेत. घरी मराठी, शाळेत मराठी, मित्रांमध्ये मराठी, सिनेमे, नाटके, आकाशवाणीवरील कार्यक्रम मराठी. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सुलभ झाली. भाषा आपण घरी,दारी, शाळेत, समाजातून शिकत असतो. यासर्व घटकांनी मातृभाषा समृद्धपणे शिकण्यास मदत केली आहे. मी म्हणतो आपण त्यांचे ऋण मान्य केले पाहिजे.

माझे प्राथमिक शिक्षण वारणा विद्यामंदिर,वारणानगर आणि माध्यामिक शिक्षण हे कोडोली हायस्कूल, कोडोली, जिल्हा कोल्हापूर येथे झाले. वारणानगरच्या शाळेत मालती गुणे यांनी शिक्षण, मातृभाषा यांची गोडी लावली. मराठी हा माझा आवडीचा विषय झाला,याचे श्रेय गुणे मॅडमना देईन. अक्षर वळणदार यावे म्हणून त्या अभ्यासात रोज शुध्द लेखन काढायला सांगत. मी अतिशय वळणदार अक्षरात ते पाटीवर काढत असे. काही वेळा माझे हस्ताक्षर सर्व मुलांना दाखवित. त्यावेळी उगाचच हर्ष वायू होत असे. मला त्यांनी अवांतर वाचनाची सवय लावली.ही पुस्तके अर्थात मराठी होती. यातून प्रेरणा घेऊन लेखक राजा मंगळवेढेकर यांचा 'कथाकथन' संग्रह वाचून काढला होता.

कोडोली हायस्कूल मध्ये आल्यानंतर रोज वर्तमानपत्रे आणि अग्रलेख वाचण्याची सवय लागली. शाळा मराठी माध्यमाची आणि माध्यम वाचन यातून नवे रस्ते दिसू लागले. इयत्ता नववीत असताना गजानन जहागीरदार यांचा 'कलेचा प्रभाव' हा धडा होता. आम्हाला तो काईंगडे सरांनी अप्रतिम शिकविला. मराठी चित्रपटाचा इतिहास सांगून हा धडा शिकविल्याने आजही तो स्मरणात राहिला. यातील काही आशय हा पुढे विश्राम बेडेकर यांच्या 'एक झाड दोन पक्षी' या आत्मचरित्रात वाचायला मिळाल्या.

मराठी मातृभाषा, कथा, कादंबरी, वृत्तपत्रीय वाचन हे मातृभाषेतून सुरू झाले.हा प्रवास  इंग्रजी साहित्यापर्यत आला. शालेय जीवनात जग समजून घेण्यासाठी मातृभाषेने मोठी मदत केली. राष्ट्रीय चळवळ, आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचे वाचन आणि आकलन हे मराठीतून अधिक चांगले झाले. विशेषतः महाविद्यालयीन शिक्षणात महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ यांची पुस्तके हा मोठा आधार होता. प्लेटो,अॅरिस्टाॅटल, हेगेल, कार्ल मार्क्स यांचे वाचन मराठीतून करता आल्याने ज्ञानसखोलता मिळविता आली.
मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना आपल्याकडे नीटशी राबविली गेली नाही. इंग्रजी हे चांगले आले यात वाद नाही. परंतु आकलन प्रक्रियेत मातृभाषा अधिक मदत करते. आपण लहानपणी खेळताना पडत होतो आणि खरचटले की, शब्द उमटायचा 'आई'! हे नातं आपल्या मायमराठीशी आहे आणि ते राहणारही आहे.
डॉ. संजय रत्नपारखी