मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

आता वाटचाल अनुदानाविना...

 

     साठोत्तरी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेने शासकीय अनुदान ते खाजगी शिक्षण व्यवस्था ही वाटचाल केली आहे. आता विस्तारीकरण आणि गुणवत्ता यांना हातात हात घालून विकास टिकवून ठेवायचा आहे. भविष्यात अनुदान मिळणार नाही, हे स्वीकारून मार्गक्रमण करण्याचा नवा मार्ग शिक्षण व्यवस्थेला शोधावा लागेल.

    महाराष्ट्र राज्य स्थापनेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत.गेल्या साठवर्षांत महाराष्ट्र हे राष्ट्रीयस्तरावर अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील शेती, सहकार, साखर कारखानदारी, उद्योग, सांस्कृतिक विकास हे विषय राष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकून गेले आहेत. महाराष्ट्रातील 'शिक्षण विकास' हा मोठा आहे. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतून शिक्षण प्रसार झाला. अनेक व्यक्ती, संस्था यांचे यात मोठे योगदान आहे. महाराष्ट्रतील शैक्षणिक परंपरेला एक मोठा वारसा लाभला आहे. हा वारसा १९६० पूर्वी सामाजिक चळवळींच्या प्रेरणेतून,तर नंतर तो राजकीय पाठिंब्यावर तयार होत गेला. यामध्ये नवी धोरणे, नव्या संस्था, विद्यापीठे , आणि तांत्रिक विकास यांचे मोठे योगदान आहे. यातून काही प्रमाणात शैक्षणिक विकास झाला आहे तशा नव्या समस्या, प्रश्नही तयार झाले आहेत. साठोत्तरी महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात काय मिळवत आहे आणि काय गमावत याचा लेखाजोखा या लेखात मांडण्याचा प्रयत्न आहे.


राष्ट्रीयप्रवाहाबरोबर:

      स्वातंत्र्यपूर्व आणि उत्तर काळात महाराष्ट्र हा नेहमीच राष्ट्रीय प्रवाहात राहिला. शैक्षणिक धोरणात्मक बाबतीत ही महाराष्ट्राने हे धोरण कायम ठेवले. स्वातंत्र्यानंतर जे बदल राष्ट्रीय पातळीवर झाले, त्याची अंमलबजावणी कायदे करून महाराष्ट्राने केली आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर काँग्रेसची सत्ता दिर्घकाळ राहिल्याने,यात संघर्ष असा झाला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. त्या आधी मुंबई राज्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये होती. या द्विभाषिक राज्यातही शैक्षणिक प्रगती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली होती. एक तर राजकीय जागृती, सामाजिक सुधारणा हा वारसा होता. शिक्षण सार्वत्रिक व्हावे, अशी राजकीय इच्छा मांडली जात होती. तशी मागणी समाजघटक करत होते. याचा मोठा फायदा १९६० नंतर प्रत्यक्षात झालेला दिसतो. १९६० नंतर महाराष्ट्रात बहुजनवादी राजकारण अधिक प्रबळ होत गेले. यशवंतराव चव्हाण यांनी मुत्सद्देगिरीने याचे नेतृत्व केले. शाळा,महाविद्यालये, विद्यापीठे यांची संख्या समाजगरजेनुसार वाढवत नेली. विद्यार्थ्यांना ई.बी.सी. सवलती, शिक्षकांचे वेतन हे शासनाच्या अख्यातरीत आणून यास व्यावहारिक बळकटी दिली. १९६२ मध्ये कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन करून ग्रामीण उच्च शिक्षण प्रक्रिया सुरु करुन दिली. या आधी सुरू झालेल्या मुंबई, पुणे, मराठवाडा आणि नागपूर विद्यापीठांना बळकट केले. शिक्षणतज्ज्ञांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिले. याच एकत्रित परिणाम म्हणजे महाराष्ट्र राज्य सत्तर दशकातही शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर राहिले.

महत्त्वाचेटप्पे:

          महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत काही महत्त्वाचे टप्पे आहेत. या टप्प्यांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगतीचा वेध आणि सध्याची आव्हाने यांची चर्चा प्रस्तुत ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचे मोठे योगदान आहे. कोठारी कमिशन हा या वाटचालीत मैलाचा दगड ठरतो. शिक्षण विस्तार योजनेला कोठारी कमिशनने मोठा हातभार लावला. याच कमिशनने १०+२+३ हे सूत्र आणून चार पिढ्यांना उच्च शिक्षणाची संधी दिली. हे कमिशन येण्यापूर्वी ११+२+२ हे सूत्र होते. यात पदवीधर कमी संख्येने तयार होत. अकरावीला अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. शिवाय अकरावी म्हणजे मँट्रिक परीक्षेला वयवर्षे १७ हे निश्चित केलेले होते. कोठारी कमिशनने दहाव्या इयत्तेत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणून वय पंधरापर्यत खाली आणले. या परीक्षेतील काठिण्य पातळी कमी करून अनेकांना उच्च शिक्षणाकडे नेलं. महाराष्ट्रात या धोरणाची अमंलबजावणी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी कसोशीने केली. त्यांनी पुढाकार घेऊन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाची स्थापना केली. 'बालभारती' ची स्थापना करून शालेय स्तरावर क्रमिक पुस्तके तयार करण्याचे काम सुरू झाले. या प्रयत्नांना मोठे यश मिळत गेले. शालेय स्तरावर उत्कृष्ट पुस्तके तयार होत गेली. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण प्रमाण वाढत जावून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण घडून आले. महाराष्ट्रात १९७५ पासून ही अमंलबजावणी कसोशीने झाली. शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचे प्रमाण लक्षणीय वाढत गेले. कोठारी कमिशन नंतर आलेल्या १९८६ च्या नव्या शैक्षणिक धोरणात आणि १९९२ मधील बदलात १०+२+३ हे सूत्र कायम राहिले. आता नव्या शैक्षणिक धोरणात बदल होत आहे. उत्तीर्ण प्रमाण वाढत गेल्यानंतर त्यांना सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांची आणि विद्यापीठांची संख्या वाढली. आज महाराष्ट्रात २१ हजार शाळा, ७ हजार ज्युनियर महाविद्यालये, २० विद्यापीठे कार्यरत आहेत,यात एक मुक्त विद्यापीठ, एक आरोग्य विद्यापीठ, एक तंत्रशिक्षण आणि चार कृषि विद्यापीठे आहेत.त्याच बरोबर १९६५ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभाग अशी विभागीय बोर्ड सुरू झाली आहेत. कोठारी कमिशनने पाठ्यपुस्तक निर्मिती बरोबर उच्च शिक्षणासाठी ग्रंथ निर्मितीची शिफारस केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, नागपूर या संस्थेची स्थापना १९६९ मध्ये होऊन या संस्थेने मराठी माध्यमातून ३०० ग्रंथ अभ्यासक, संशोधक यांच्याकडून लिहून घेतले होते. महाराष्ट्रात १९९५च्या सत्तातरानंतर शिवसेना-भाजप युती सरकारने ते तोट्यातील महामंडळ म्हणून बंद केले. साठच्या दशकापासून शासन शिक्षणात गुंतवणूक करीत असे. ऐंशीच्या दशकापर्यत हे धोरण चालले. त्यानंतर 'विनाअनुदानित शिक्षणसंस्था'चे पर्व सुरू झाले.

विनाअनुदानिततत्व:

       महाराष्ट्रात सत्तर आणि ऐंशीच्या दशकात शासकीय आधाराने शैक्षणिक विकास सुरू होता. यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये मर्यादित होती. विद्यापीठ कार्यक्षेत्रात दोन अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये असत.यात बी.ई. आणि एम.बी.बी.एस.चा प्रवेश हा बारावीतील पीसीबी,पीसीएम ग्रुपवर ठरत असे. यात ज्यांचे गुण नव्वद टक्के किंवा त्याच्या आसपास असत, त्यांना कोठेतरी संधी मिळे. अन्य विद्यार्थी हे मग पदविका किंवा बीएससी करणे पसंत करत. यात सत्तर टक्क्यांहून अधिक गुण पडून संधी गमावलेले अधिक असत. महाराष्ट्रात खाजगी काँलेजस नसल्याने, क्रय शक्ती असलेले विद्यार्थी हे कर्नाटक वा आंध्रप्रदेश आणि आजच्या तेलंगणातील खाजगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयात जावून शिक्षण घेत. ही महाविद्यालये खाजगी असल्याने देणग्या गोळा करत. यात त्यांची माया कोट्यवधी रूपयांत जमा होत असे. महाराष्ट्रात याची चर्चा व्हायची परंतु राजकीय निर्णय होत नव्हता. वसंतरावदादा पाटील यांनी ऐंशीच्या दशकात हे धाडस करून खाजगी संस्थाना इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात नवीन काँलेजस सुरू झाली. यात दादांनी काँग्रेसमधील नेत्यांच्या संस्थांना वाट मोकळी करून दिली. आमदार, खासदार, मंत्री यांनी स्वतःच्या संस्था सुरू करून टाकल्या. डॉ. पतंगराव कदम, डॉ. डी.वाय. पाटील, कमलकिशोर कदम, दत्ता मेघे, डॉ. पद्मसिंह पाटील, डॉ. वि.दा. कराड, यांची खाजगी इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय महाविद्यालये यातून सुरू झाली. त्याचबरोबर कायमस्वरूपी विनाअनुदानित आर्ट्स, काँमर्स, सायन्स महाविद्यालये आणि बी.एड. काँलेजसना परवाना देण्याचा सपाटा सुरू झाला. यातून शासकीय आणि खाजगी व्यवस्था यांच्यात सुप्त स्पर्धा सुरू झाली. खाजगी संस्थांनी शासकीय व्यवस्थेतील वरिष्ठ शिक्षक आपल्या संस्थेत जादा पगार देऊन अक्षरशः पळवून नेले. मुंबई, पुणे विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने खाजगी काँलेजस सुरू झाली. मुंबई शेजारील नवी मुंबई,वाशी परिसरात नव्या शिक्षण संस्थाच्या टोलेजंग इमारती आणि त्यांचे ऐश्वर्य उभे राहिले. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, जालना तर विदर्भात नागपूर, अमरावती ही शहरे खाजगी संस्थांनी गजबजून गेली. विनाअनुदानित संस्थानी नव्वदचे दशक सुरू होण्या अगोदर शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळविला. शासकीय धोरणे, विद्यापीठांचे निर्णय यावर त्यांचा प्रभाव दिसत होता. विद्यापीठांची सिनेट, विद्वतपरिषद, व्यवस्थापन परिषद यात त्यांनी लोक घसवून, हवे ते निर्णय पदरात पाडून घेतले. यातील काही गोष्टी उघड्या पडल्या परंतु त्यांना कायमस्वरूपी चाप हा शासनाने कधीच लावला नाही. माध्यमांनी विशेषतः मुद्रित माध्यमातून यावर प्रकाश पडत राहिला. मराठडवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात १९८७-८८ मध्ये डॉ. ना.य.डोळे समितीने अनेक विनाअनुदानित संस्थाची पाहणी करून अहवाल दिला होता. म.टा.चे प्रतिनिधी गोपाळ साक्रीकर यांनी यावर लेखमाला आणि संपादक गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहून वास्तव पुढे आणले होते. त्याच बरोबर इतर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही चुकीच्या गोष्टी स्थानिक जिल्हा वर्तमानपत्रांनी भिडस्तपणे मांडल्या होत्या. यातील बऱ्याच गोष्टी अनेकांच्या विस्मृतीत गेल्या असतील. नव्वद नंतर भारतीय व्यवस्थेने खुलेआमपणे 'खाऊजा' धोरण आर्थिक विकासासाठी स्वीकारले. त्यामुळे खाजगी शिक्षण संस्थांना राजकीय बळ अधिक मिळत गेले. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता दिर्घकाळ राहिली. त्यांच्या नेत्यांच्या खाजगी संस्था असल्याने अप्रत्यक्षपणे पक्षाला आर्थिक बळ मिळत गेले. यातील काही नेते सोयीसाठी भाजप-शिवसेनेतही गेले. परंतु त्यांच्या संस्थांना धक्का लागला नाही. गेल्या तीस वर्षांत काही खाजगी संस्थानी आर्थिक भरभराट करून स्वतः साठी अभिमत वा खाजगी विद्यापीठ दर्जा प्राप्त करून घेतला आहे,हे विनाअनुदानित संस्थाचे व्यावसायिक यशच म्हणावे लागेल.

खाजगीकरण:

      आज महाराष्ट्रात शासकीय आणि खाजगी विद्यापीठे अशा दोन पध्दतीत शिक्षण व्यवस्था विभागाली गेली आहे. शासकीय विद्यापीठेही कायद्याने बांधलेली व्यवस्था. १९६० नंतर १९७४, १९९६ आणि २०१६ मध्ये तीन वेळा विद्यापीठ कायदा बदलला गेला. १९७४ च्या कायद्यात शासन नियंत्रण प्रस्थापित झाले. हा कायदा होण्यापूर्वी प्रत्येक विद्यापीठाचा कायदा वेगळा होता. विद्यापीठ कामात सूसत्रता यावी या भूमिकेतून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा तयार करण्यात आला. शासनाने १९८३ पासून विनाअनुदानित शिक्षण धोरण स्वीकारले, त्याचा प्रभाव १९९६ आणि नंतरच्या २०१६ च्या कायद्यात दिसतो. आता खाजगी आणि कलस्टर विद्यापीठ व्यवस्था आकार घेत आहे. यासाठी सुध्दा शासनाला विधीमंडळात कायदा करावा लागतो. महाराष्ट्रतील गेल्या तीस वर्षांतील शैक्षणिक वाटचाल विचार करता, शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत हळूहळू यातून शासन निवृत्त होताना दिसते. विद्यापीठ व्यवस्था वरकरणी स्वायत्त आहे, असे म्हटले तरी शासकीय हस्तक्षेप चालूच असतो. विद्यापीठांतील शासनमान्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन शासन देते. त्यामुळे हे नियंत्रण अधिक दिसून येते. याशिवाय वेळोवेळी निघणारे शासन निर्णय विद्यापीठांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. शैक्षणिक वर्ष २००० पासून तंत्रज्ञान वापराचा खूप बोलबाला शिक्षण व्यवस्थेत सुरू झाला आहे. विद्यापीठ महाविद्यालये व ज्यनियर महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया ही आँनलाईन करण्यात आली. परीक्षा आणि मूल्यमापन यातही तंत्रज्ञान वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या वीस- पंचवीस वर्षांत विद्यापीठेही स्वतः चा स्वावलंबी तंत्रज्ञान विकास गमावून खाजगी कंपन्याचे ग्राहक बनले आहेत. यात दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्ची पडून हाती काही लागत नाही, हे वास्तव आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान विकासात विद्यापीठ व्यवस्था मात्र समाजात बदनाम होत चालली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कोविड-१९ ची जागतिक समस्या उभी राहिली. मार्च २० पासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विविध विभाग बंद होते. आता ते अंशतः सुरू आहेत. परीक्षा निर्णय लांबत जावून अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता आँनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पदवीप्रमाणपत्र वितरित केले जाईल. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ अद्याप सुरू होण्याची प्रतिक्षा करत आहे. याच वाटचालीत नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. नव्या धोरणात कौशल्य विकासावर भर दिसतो. सध्याच्या १०+२+३ या शैक्षणिक चौकटीला पर्याय म्हणून ५+३+३+४ हे सूत्र स्वीकारले आहे. आज विद्यापीठ स्तरावर सत्र आणि श्रेयांक पध्दती राबविली जात आहे. यात विद्यार्थी हा श्रेयांक मिळवत तो पदवी किंवा पदविका प्राप्त करेल. यापुढे प्राथमिक शिक्षण हे पाचव्या इयत्तेपर्यंत राहिल.त्यानंतर तो माध्यामिक स्तरात येईल. दहावी ऐवजी तो अकरावीत परीक्षा देऊन पुढील चार वर्षांच्या टप्प्यात जाईल. यात विद्यार्थी त्याच्या विषय ज्ञानाबरोबर इतर विषय शिकू शकेल. त्याला मूक्स कोर्सेसची आँनलाईन संधी उपलब्ध असेल. शेवटच्या सत्रात त्याला इंटरशिप करावी लागेल आणि त्यानंतरच पदवी घेऊ शकेल. सध्या हे धोरण नुकतेच जाहीर झाले आहे.काही घटक राज्येही यातील काही तरतुदींना विरोध करीत आहेत. नव्या
शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ शक्य होईल.

नवीआव्हाने:

      महाराष्ट्रातील शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षण व्यवस्थेला आता खऱ्या अर्थाने स्पर्धेत उतरून अस्तित्व टिकवायचे आहे. जागतिकीकरण येऊन तीस वर्षांच्या कालावधीत सर्वच व्यवस्था बदलत आहेत. शासकीय उपक्रमातून गुंतवणूक काढून घेतली जात आहे. त्यामुळे भविष्यात शासकीय शिक्षण व्यवस्थेला खूप लवचिक पध्दतीने काम करावे लागेल. यात शासन व्यवस्था ही लवचिकता स्वीकारणार काय, हा खरा प्रश्न आहे. एकूणच वर्तमान परिस्थिती विचारात घेता; शिक्षण व्यवस्थे समोर पुढील आव्हाने दिसतात.
१. शासकीय शिक्षण व्यवस्थेला अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
२. शिक्षण व्यवस्था काळानरूप करणे, हे दुसरे आव्हान असेल.
३. शासकीय मदत कमी होत जाईल आणि स्वतः ची आर्थिक उत्पन्न साधने विकसित करावी लागतील.
४. शिक्षण व्यवस्थेत व्यावसायिकता आणावी लागेल.
५. शिक्षण व्यवस्थेचा सतत आढावा घेत भविष्यातील दिशा शोधता आली पाहिजे.
६. भविष्यात काँलेजस आणि विद्यापीठ शिक्षणाचे स्वरूप हे कलस्टर पध्दतीने राहिल.त्यामुळे कमी मनुष्यबळात गुणवत्ता शिक्षण देता आले पाहिजे.
७. शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे,हे मोठे आव्हान राहिल.
८. विद्यार्थी आणि समाज घटकांचा विश्वास संपादन करून तो टिकविता आला पाहिजे.
९. आंतरविद्याशाखीय शिक्षणप्रणाली स्वीकारून नवे प्रारुप तयार करणे.
१०. शिक्षण हे सामान्य माणसाच्या हातून निसटून जाईल,एवढे ते महागडे होत आहे. यात शासकीय शिक्षण व्यवस्था लोकांना दर्जेदार शिक्षण देऊन दिलासा देण्याचे मोठे आव्हान पेलावे लागेल.
११. पारंपरिक शिक्षण आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण यांची सांगड घालत हायब्रीड मोड विकसित करणे.
१२. शैक्षणिक संशोधन, ज्ञाननिर्मिती यात सातत्याने योगदान देणे.
१३. शासकीय यंत्रणा, शिक्षण खाते, शैक्षणिक संस्था, कायदे, नियम, यात आमुलाग्र बदल आणण्यासाठी राजकीय इच्छा दाखविणे,हे शासनापुढे आव्हान राहील.
१४.शिक्षणातील राजकीय हस्तक्षेप टाळणे आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचे काम करू देण्याचे औदार्य दाखविणे,जे सहसा कधीच दाखविले जात नाही.
१५. जगभरातील शिक्षण व्यवस्थेत 'वाचन,लेखन आणि श्रवण' ही मूलभूत कौशल्ये असतात. त्यांचा विकस विद्यार्थी शिक्षणात विविध पातळ्यांवर करत पुढे जात असतो. आजही ही कौशल्य खूप महत्त्वाची आहेत. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत विद्यार्थी हे वाचन,लेखनापासून दूर गेले आहेत. विद्यार्थी हे सध्या फक्त श्रवण करतात. हा एकांगी विकास झाला. महाराष्ट्रातील शैक्षणिक विश्वात विद्यार्थ्यांमध्ये या तीनही कौशल्य वाढीस अनुकूल वातावरण तयार करणे आणि ते टिकविणे,हे मात्र मोठे काम आव्हान म्हणून समोर असेल.
१६. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक संघटनांनी सुद्धा सतत जागृत राहून शैक्षणिक विकासावर नजर ठेवली पाहिजे. १९९० नंतर हे घटक फारच कमी पडलेले दिसतात. गेल्या तीस वर्षांत शिक्षक संघटना या फक्त नेट-सेट आणि वेतनप्रश्नांच्या पुढे गेल्या नाहीत. शैक्षणिक हित ही सांभाळण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील.


डॉ.संजयरत्नपारखी
इमेल:rsanjay96@hotmail.com

( सोंजन्य: कान्हेरी दिवाळी अंक २०२०)



शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

आठवणींतील शिक्षक

 

 

    आज पाच सप्टेंबर म्हणजे,भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस की,जो 'शिक्षकदिन' म्हणून साजरा केला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं मानवी आयुष्यात ज्ञान, विकास यांनी जोडलेले आहे. मी आमुक शिक्षकाचा विद्यार्थी किंवा आमुक एक माझा विद्यार्थी, ही ओळख खूप महत्त्वाची असते. यात विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं जैविक नसूनही,ते अधिक बांधलेले दिसते. मी लाँकडाऊन काळात वारणानगरशी निगडित काही आठवणी शब्दबध्द करताना, 'आठवणींतील शिक्षक' हा विषय जुन्या आठवणी जागवितांना लक्षात येऊन गेला. तो मांडण्यासाठी 'शिक्षकदिन' हा सगळ्यात चांगला दिवस आहे.

 

  आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप लोक येतात आणि जातात. तसे शालेय जीवनापासून उच्च शिक्षणापर्यंत खूप शिक्षक येतात. यातील काही अत्यंत प्रभावशाली असतात. ते आयुष्याला वेगळे वळण देऊन जातात. जो शिक्षक आपल्या विकासासाठी प्रयत्न करतो, आपल्यात प्रगती पाहतो, ते शिक्षक हा आपला आठवणींतील अमूल्य ठेवा असतो. माझे प्राथमिक शिक्षण श्री वारणा विद्यामंदीर, माध्यमिक शिक्षण हे कोडोली हायस्कूल, ज्युनिअर काँलेज वारणा महाविद्यालय तर पुढील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे अनुक्रमे छ.शहाजी महाविद्यालयात आणि राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ येथे झाले. या वाटचालीत अनेक शिक्षक भेटले. त्यांनी माझ्या शिक्षणाला आणि प्रगतीला निश्चित अशी दिशा दिली. खरं म्हणजे हे आयुष्यातील संचित आहे. यातील काही शिक्षकांना आठवणींच्या स्वरूपात भेटण्याचा प्रयत्न आहे.

 

     वारणा विद्यामंदीर या शाळेची स्थापना साठच्या दशकातील आहे. वारणा सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ही शाळा सुरू झाली. शाळा सुरु झाली त्यावेळी ती सातवीपर्यंत होती. त्यावेळच्या शासकीय नियमाप्रमाणे इयत्ता चौथीला पूर्व प्राथमिक प्रमाणापत्र आणि इयत्ता सातवीला प्राथमिक प्रमाणपत्र परीक्षा असे. या दोन्ही परीक्षा,केंद्र परीक्षा असत. याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता चौथी आणि सातवीसाठी स्काँलरशिप परीक्षेची संधी असे. त्यावेळी विद्यार्थ्यांना इयत्ता सातवी पर्यंत इंग्रजी भाषा अध्ययनासाठी नव्हती. विद्यार्थी आठवीत गेल्यानंतर त्याला इंग्रजी भाषा शिकण्याची संधी होती. आठवी ते अकरावी या चार वर्षांत इंग्रजी शिकून ते मँट्रिक परीक्षेला बसत. अशा साठ आणि सत्तरच्या दशकात या शाळेला रघुनाथ पाटील सरांनी समर्थ नेतृत्व दिले. वारणा विद्यामंदिर मध्ये येण्यापूर्वी पाटील सर जिल्हा परिषद शाळेत होते. तेथून ते अनेक वर्षे डेप्युटेशनवर वारणेची शाळा सांभाळत होते. याशाळेची शैक्षणिक पायाभरणी सरांनी मेहनतीने करून दिली. ते उत्तम शिक्षक असल्याने, मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळून चौथीच्या स्काँलरशिप तुकडीला शिकवित. प्रत्येक शैक्षणिक वर्षात अनेक विद्यार्थी स्काँलरशिप प्राप्त करत,यामागे त्यांची अपार मेहनत असायची. शाळेत प्रार्थना सामुदायिक असे. यावेळी दिनाचे औचित्य साधून गोष्टी स्वरूपात माहिती देत. मनाने ते अत्यंत प्रेमळ अभ्यासाबाबतत कडक राहत. अधूनमधून अनेक वर्गांवर चक्कर मारत. एखादा धडा शिकवत किंवा गणित घालत. पालकांशी अत्यंत अदबीने वागत.त्यामुळे विद्यार्थी, पालक यांच्या मनात पाटील सरांबाबत आदरयुक्त भिती दिसायची. पाटील सर हे वारणा विद्यामंदिरचे नेतृत्व करत असताना, त्यांना सहकारी शिक्षक तसेच भेटले. मी शाळेत विद्यार्थी असताना डोंगरे नावाचे सिनिअर शिक्षक होते. म.ग. कुलकर्णी, गजानन लोमटे, आर.डी.मोरे यांच्या बरोबर महिला शिक्षकांमध्ये पाटील सरांच्या पत्नी, पाटील मँडम, मालती गुणे, जयमाला पाटील ,देशपांडे , महाजन या महिला होत्या. बालवाडी छोटा आणि मोठ्या गटाची जबाबदारी प्रभू मँडमनी अनेक वर्षे सांभाळली होती. शाळेत मला प्रामुख्याने लोमटे सर आणि गुणे मँडम यांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. माझ्या अभ्यास प्रगतीला गुणे मँडमनी वळण दिले.माझ्या प्रत्येक गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे. हे लक्ष त्यांनी शेवटपर्यंत ठेवले. मी वारणानगरहून बाहेर पडल्यानंतरही त्या माझ्या बद्दल चौकशी करत. मी १९९८ मध्ये मुंबई विद्यापीठ सेवेत रूजू झाल्याचे कळताच त्यांनी आशिर्वाद आणि शुभेच्छा पत्र मला पाठवून दिले, जे मी आजही सांभाळून ठेवले आहे. वारणा विद्यामंदिर मध्ये संगीत शिक्षक म्हणून शंकरराव कुलकर्णी काम करत.ते अधूनमधून अनेक कवितांना चाली लावण्यासाठी वर्गावर येत. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शंकरराव कुलकर्णी हे मुलांकडून फारच दर्जेदार सादरीकरण करून घेत. आम्ही चौथीत असताना इंग्रजी भाषेची तोंड ओळख व्हावी म्हणून पानसरे नावाच्या मँडम नियुक्त झाल्या होत्या. त्यांनीच आम्हाला इंग्रजीतील अक्षर ओळख करून दिली.

 

  मी माझे माध्यमिक शिक्षण हे कोडोली हायस्कूल मध्ये पूर्ण केले. तत्पूर्वी दोन वर्षे वारणा विद्यालयात होतो. या कमी काळातही तेथे काही चांगले शिक्षक भेटले. वारणा विद्यालयात तोरो मँडम या उत्तमपणे संस्कृत आणि मराठी विषय शिकवत. मी त्यांच्या कडून मराठी विषय शिकलो. त्याचबरोबर भूगोल विषय शिकविणारे मल्हारी सर हे आजही लक्षात राहिले. आलोणे मँडमनी आम्हाला सामान्यविज्ञान हा विषय खूप चांगला शिकविला होता. हिंदी विषय हा परमणे सर खूपच रंजक पध्दतीने शिकवत. ते शाळेत बऱ्यापैकी वरिष्ठ शिक्षक होते. इंग्रजीतील शब्द उच्चार आणि त्याची ब्रिटिश पध्दती याची तोंडओळख ग्रामोफोन वापरून करून देणारे देवळालीकर, हे थोडे वेगळेच शिक्षक होते. एन.जी.पाटील सरांनी इयत्ता पाचवीत आम्हाला इंग्रजी बरोबर क्रिकेटही शिकविले होते. क्रिकेटची उत्तम जाण आणि विद्यार्थ्यांसाठी ते कोच होते. स्ट्रेट बँट कशी खेळावी,गोलंदाजी कशी करावी, याचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी दिले. ते मुलांकडून लेदर बाँलवर क्रिकेट सराव करून घेत असत.

      मी जून १९७७ मध्ये कोडोली हायस्कूल मध्ये आलो येथे मला अध्ययनाची नवी दिशा मिळून गेली. शिक्षणाची आवड आणि गती या शाळेच्या माध्यमातून मिळाली. कोडोली हायस्कूलची स्थापना स्वातंत्र्याच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४६ ची आहे. यंदा शाळेने पंच्याहत्तर वर्षात पदार्पण केले आहे. माझे शैक्षणिक भाग्य हे की, अनुभवसंपन्न शिक्षकांच्या हाताखाली माध्यामिक शिक्षण घेता आले. जी.डी.इंगवले सरांनी सर्वात जास्त काळ या शाळेचे नेतृत्व केले. ते गणिताचे शिक्षक होते. जुन्या मँट्रिक पासून बीजगणित शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. त्यांनी मला नववी आणि दहवीत बीजगणित शिकवले. विद्यार्थ्यांना समजल्याशिवाय पुढे जायचे नाही, हे त्यांचे सूत्र होते. मग त्यासाठी गुरुवारी दुपारी ,रविवारी आणि सुट्टी दिवशी जादा तास घेत. गणित कसे वाचावे, ते सोडविताना काय माहिती प्रश्नात आहे, हे विद्यार्थ्यांना मांडायला लावून त्याला प्रोत्साहित आणि फोकस करत. विद्यार्थ्यांनी पाटी पेन्सिल घेऊन सराव करावा, हा त्यांचा सल्ला मी अंमलात आणला होता. त्यामुळे बीजगणित हा विषय आवडू लागला आणि अपेक्षित प्रगती परीक्षेत दिसू लागली. शाळेत बी.एच.कणसे हे इंग्रजी विषयाचे शिक्षक अत्यंत कडक शिस्तीचे होते. कणसे सर हे अनेक वर्षे शाळेची एन.सी.सी. पाहत होते. त्यामुळे शिकविण्यात अत्यंत फोकस राहत. इंग्रजी शब्दउच्चार,व्याकरण यात ते फारच वाकबगार वाटत. आम्हाला दहावी पर्यंत इंग्रजी विषय हा एस.ए. आपटे यांनी खूप खेळीमेळीत शिकविला. त्यांनी व्याकरण पाया चांगला करून घेतला. इंग्रजी काळ पाट करून घेतले. या गोष्टी दैनंदिन कामात आजही उपयोगी पडत आहेत. याच बरोबर ए.एम. पाटील सर हे आम्हाला रसायनशास्त्र उत्तमपणे शिकवत. आमच्या तुकडी व्यतिरिक्त इतर तुकड्यांना, ते बीजगणित अगदी हसतखेळत शिकवत असत. मराठी, विषयासाठी आम्हाला देसाई मँडमनी मार्गदर्शन केले. त्यांची शिकविण्यात सातत्य मूल्यमापन पध्दती राहायची. जेवढा भाग शिकविला आहे, तेवढ्या भागावर लघुप्रश्न देत असत. धडा पूर्ण होताना भरपूर बहुपर्यायी, लघुप्रश्न होत. याशिवाय पुस्तकातील प्रश्न सोडवून घेत. त्यामुळे धडा पूर्ण होताना, बरीच तयारी होऊन जाई. सामाजिकशास्त्रे विषयात इतिहास, भूगोल, नागरिकशास्र यांचा समावेश होत असे. शाळेतील वास्कर सरांनी आम्हाला इतिहास,नागरिकशास्त्र शिकवले ,तर जाधव सरांनी भूगोल विषय शिकविला. वास्कर सर हे पुस्तक कधीही हातात न घेता,ओघवत्या शब्दांत इतिहास शिकवत. शिकवितांना अधूनमधून बहुपर्यायी प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगत. जाधव सर हे विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेत. शाळेत अवांतर वाचन,चर्चा इंग्रजी वाचन याबाबत बी.टी. आवळे सरांचे सतत प्रोत्साहन लाभले. मला त्यांनी सतत नवनवे मार्गदर्शन दिले. ते स्वतः उत्तम इंग्रजी उत्तम वाचक होते. ते सातत्याने नव्या गोष्टी सांगत असत. त्यामुळे अवांतर वाचनाची बऱ्यापैकी आवड निर्माण होत गेली. भूमिती आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय सोळसे सरांनी मेहनतीने शिकविले. ते सतत शाळेच्या प्रयोगशाळेत राहत असत. कोडोली हायस्कूल हे वारणा परिसरातील सर्वात जुनी शाळा आहे. त्यामुळे त्यावेळी ही शाळेत शिक्षक संख्या मोठी होती. यामध्ये काईंगडे हे उत्तम मराठी तर गुळवणी सर हे शारीरिक शिक्षक होते. काईंगडे सरांनी मराठी चित्रपटातील मुकपट आणि बोलपट जमाना पाहिला होता. चित्रपट इतिहासाची चांगली माहिती त्यांना माहीत होती.

 

      दहावी उत्तीर्ण झाल्यावर ज्युनिअर काँलेज शिक्षण विज्ञान शाखेतून आणि ते वारणा महाविद्यालयातून घेतले. हा एक महत्त्वाचा टप्पा होता. इंग्रजी माध्यम, बारावीतील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांची काठिण्यपातळी हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांसमोर आव्हानच होते. त्यावेळी बारावी परीक्षेच्या गुणांवर मेडिकल आणि इंजिनिअरिंगची प्रवेश निश्चित होत. अनेक मुले आणि मुली ढोरमेहनत आणि पाठांतर यावर बाजी मारून जात. मेडिकलसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि इंजिनिअरिंगसाठी वालचंद काँलेज किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे प्रवेश मिळणे याला मोठी प्रतिष्ठा होती. आम्हाला या दोन वर्षात वारणा महाविद्यालयातील खूप चांगले शिक्षक लाभले होते. प्रा.के.एस.शेवडे हे वरिष्ठ महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख होते. त्यांनी बारावीत गणित शिकविले. या शिवाय प्रा. भा.रा. बापट, प्रा. म्हस्के हे शिक्षक गणितातील काही भाग शिकवत असत.यात शेवडे सर हे फारच कडक राहत. भौतिकशास्त्र विषयासाठी प्रा.माने, प्रा. कुलकर्णी, प्रा. किबिले हे शिक्षक लाभले. रसायनशास्त्रासाठी प्रा.पी.आर. कुलकर्णी, प्रा.दामले आणि प्रा.जाधव हे शिक्षक होते. यात आँरगँनिक केमिस्ट्री हे प्रा. कुलकर्णी सर धमालपणे शिकवित. मी बारावी पूर्ण करत असतानाच आपला ओढा हा सामाजिकशास्रे,भाषा विषयांत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झाल्यावर राज्यशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

 

     छ.शहाजी महाविद्यालयात शिकत असताना तेथे कला शाखेसाठी खूपच अनुभवी आणि विद्यार्थीप्रेमी शिक्षक भेटले. साहित्यिक चंद्रकुमार नलगे, इतिहास संशोधक डॉ. जयशिंगराव पवार, इंग्रजी, संस्कृत, मराठी अर्धमागधी भाषेचे अभ्यासक प्राचार्य कंटाबळेसर,डॉ. दिलीप पंगू, प्रा. आनंदराव वैराट, राज्यशास्त्रासाठी प्रा. र.घ. वराडकर हे शिक्षक होते. इतिहास विषय वैराट सर अतिशय उत्तमपणे शिकवत. त्यांची हातोटी ही खूप प्रभावी आणि मुद्देसूद असायची. मी वराडकर सर आणि प्रा. मोरे यांच्याकडून राज्यशास्त्र समजून घेतले. राजकीय विचारवंत, आधुनिक राजकीय विश्लेषण, महाराष्ट्र राजकारण या अभ्यासात वराडकर सरांनी योग्य दिशा दिली. आमचे पदवी शिक्षण पूर्ण होताना पंचायत राज्य पध्दतीवर प्राचार्य पी.बी. पाटील समितीचा अहवाल आला होता. यावर सरांनी पुढाकार घेऊन कोल्हापूर जि.प. कार्यकारी अधिकाऱ्याची भेट आणि चर्चेची संधी आम्हाला मिळवून दिली होती.शहाजी काँलेजचे ग्रंथालयात ब्राम्हणेतर चळवळीतील काही जुन्या वर्तमानपत्रांचे अंक होते. ते विद्यार्थीदशेत वाचायला मिळाले. संशोधनपर पुस्तके वाचण्याची सवय याच काळात अधिक विकसित होत गेली.

        शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली. विद्यापीठ वातावरणात जाऊन शिक्षण प्राप्त करणे, हा अनुभव खूप वेगळा असतो. खरं म्हणजे ही शैक्षणिक अनुभव विश्वात मोठी वाढ असते. डॉ. के.के. कावळेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. गोपाळ गुरू, डॉ. सुरेंद्र जोंधळे आणि डॉ. श्रीमती वासंती रासम या शिक्षकांनी आम्हाला राज्यशास्त्राचे अध्यापन केले. डॉ. कावळेकर सर हे त्यावेळी विभागप्रमुख होते आणि ते लोकप्रशासनशास्त्र शिकवित. डॉ. अशोक चौसाळकर सर यांनी राजकीय सिध्दांत, राजकीय विचार शिकविले. भारतीय राजकारणाची चिकित्सा,जात-धर्म राजकारण, राष्ट्रउभारणी, हे नवे विषय डॉ. गोपाळ गुरु सरांनी समजावून सांगितले. डॉ. जोंधळे सरांनी आंतरराष्ट्रीय राजकारण तर डॉ. रासम मँडमनी आंतरराष्ट्रीय संघटना हे अभ्यासक्रम शिकविले. राज्यशास्त्र विभागात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात खूप आत्मयितेचे संबंध होते आणि आजही ते टिकून राहिले. विभागात डाटा बँक होती. यात विविध राजकीय विषयांवर माहिती संकलित केली जात असे. त्याकाळी विभागात विविध राज्यांतून इंग्रजी वर्तमानपत्रे येत. यात आम्हाला द हिंदू, टेलिग्राफ, टाइम्स आँफ इंडियाचे मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबादचे अंक वाचायला मिळत. भरपूर वाचा आणि प्रश्न विचारत राहा,हा संदेश याच विभागात आम्हाला मिळाला. राज्यशास्त्र विभागात सक्रिय राजकारण करणारे नेते, अभ्यासक यांची व्याख्याने ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पदव्युत्तर पदवी बरोबरच अनुभव विश्व वाढवून घेता आले.याकामी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत गेले, ही खरी मिळकत.

 

   मी माझे पीएच.डी संशोधन पदवी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून केले. दूर आणि मुक्त शिक्षण पध्दतीत काम करत असल्याने,यातील एखाद्या शैक्षणिक समस्येवर काम करावे हा विचार होता. मी स्वतः या विद्यापीठात काही काळ नोकरी केली होती. मुंबई विद्यापीठात आल्यावर डॉ. ना.रा.चौधरी सरांनी मला यात बहुमोल मार्गदर्शन दिले. तत्कालीन कुलगुरू प्राचार्य अशोक प्रधान सरांनी मला आंतरविद्याशाखीय अभ्यास करा,हा मोलाचा सल्ला दिला होता. त्यातून दूर शिक्षण पद्धतीतील गुणवत्ता संवर्धन अशा नव्या क्षेत्रात काम करू शकलो. नवे विषय वाचने, ते समजून घेणे ही तशी मानसिक पातळीवर अवघड प्रक्रिया असते. परंतु अशा संशोधन कामातून तशी मानसिकता तयार करण्यात थोडाफार यशस्वी झालो,हे श्रेय मार्गदर्शकांचे आहे.

 

   श्री वारणा विद्यामंदीर ते विद्यापीठीय शिक्षण आणि संशोधन हा विद्यार्थीदशेतील शैक्षणिक प्रवास कधी अतिशय निराशाजनक तर कधी उत्साह वाढविणारा होता. आमच्या घरी आणि गावीही बहुतेक विद्यार्थी हे प्रथमच शिक्षण घेत होते. घरात शिक्षण वारसा नव्हताच.आई-वडिलांना शिक्षणाच्या मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शिक्षक पाठीशी उभे राहिले. त्यांची थाप, प्रोत्साहन यामुळे माझ्या सारखे अनेक विद्यार्थी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएच.डी सारखे संशोधन काम करू शकले. माझ्या यातील काही आठवणी यात मांडल्या. तशा अनेकांच्या यात विविध आठवणीं असू शकतात. आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने आठवणींतील शिक्षकांचे स्मरण करण्याची संधी घेत आहे इतकचं. आयुष्यात भेटलेल्या सर्व शिक्षकांना विनम्र नमस्कार!

डॉ. संजय रत्नपारखी