सोमवार, २५ मे, २०२०

आमचा शेजारधर्म


                                             


    वारणानगरची निर्मिती हा साठच्या दशकात राजकीय इच्छाशक्तीचा अविष्कार होता. ग्रामीण भागात सहकारी औद्योगिकक्षेत्र निर्माण होण्याचा हा काळ. याच काळात पश्चिम महाराष्ट्रात अनेक सहकारी कारखाने सुरू झाले. वारणानदीच्या खोऱ्याचा प्रदेश मानला जातो, यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा भाग येतो. या परिसरात जनजागृती करून तात्यासाहेब कोरे यांनी हा कारखाना आणि तेथील सहकारी उद्योग सुरु करून दिले. यातून ग्रामीण परिसरातील पहिला मध्यमवर्ग घडला गेला. मध्यम कामगार आणि शेतकरी हे उभे राहिले. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात नव्या गोष्टी आल्या. यातून एक नवसमाज तयार झाला. यासमाजाला स्वतः ची अशी एक ओळख आहे. या नवसमाजातील ग्रामीण सामाजिक सख्य, यातील प्रेम, उत्साह, आदर, शेजारधर्म, असे विविध पैलू टिपण्याचा हा एक प्रयत्न आहे.

    ही उभारणी सहकारी उपक्रमासाठी झाल्याने त्याला एका काँलनीचे स्वरूप पहिल्यापासून मिळाले. सिमेंट चाळ, बेंगलोरी चाळ, पत्र्याचे छत असलेली तट्टाचाळ, बैठे बंगले असे बांधकाम प्रारुप होते. सर्वसाधारणपणे एकूण पाचशे घरांचा स्वतंत्र कट्टा असलेली ही व्यवस्था होती. काँलनी प्रशस्त होती. मोठे डांबरी रस्ते, मधोमध पथदिप, दोन्ही बाजूने दुतर्फा झाडे. लक्षात भरू शकेल,अशी दैनंदिन स्वच्छता. घरोघरी सर्व नागरीसुविधा आणि भरपूर पाणी. या सुविधा त्यावेळी कोल्हापूर, सांगली यांच्या न.पा.क्षेत्रातही नव्हत्या. घरी येणाऱ्या नातेवाईकांना याचे फारच आश्चर्य आणि कौतुक वाटत असे. वसाहतीत वास्तव्य करणारा वर्ग हा प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन, ब्राह्मण, सीकेपी, सारस्वत, माळी,सुतार आणि लोहार अशा विविध जातींमधील होता. याशिवाय मुस्लिम, ख्रिस्ती धर्माचे लोकही वास्तव्य करून होते. बहुतेक लोक कारखाना आणि कार्यालयीन कामात संबंधित असेच होते. साखर कारखाना गळीत हंगाम काळात शिफ्ट मध्ये लोक कामावर जात. त्यांना समजावे म्हणून विविध ठराविक वेळेत भोंगा वाजवला जाई.दिवसा आणि रात्री ऊस वहातूक सुरू असे. त्यामुळे रस्ते चौवीस तास जागे राहत. गळीत हंगाम मे महिन्यात संपला की, ही वर्दळ कमी होई.

   वसाहतीमधील घरांची रचना ही समांतर आणि समोरासमोर होती. सकाळी घर केर काढण्यासाठी उघडल्या नंतर रात्री झोपताना ते बंद होई. घरातील लोक, स्त्रिया या शेजारीपाजारी बोलत, गप्पा मारत काम उरकत असत. 'पारदर्शी'हा शब्द बहुधा भौतिकशास्त्र पुस्तकात असण्याच्या काळात,तो येथे जगण्याचा विषय होता. विविध जातीधर्माचे लोक एकोप्याने जीवन जगत होते. कोणाच्या घरी जाण्यात औपचारिकता नव्हती. सर्वांच्या घरी जगण्यातील समानता होती. चाळीतील एखादे लग्न हा सर्वांच्या सहभागाचा विषय होता. लग्ने ही दारात मांडव उभा करून पार पाडत किंवा शास्त्रीभवनात उरकून घेत. मांडव उभा करण्यासाठी चाळीतील मित्र परिवार सर्वात पुढे राहत असे. लग्नातील बुंदी लाडू तयार करणे ,हा सामुदायिक कार्यक्रम असे. बहुतांश लग्नात वळगड्डे मामा हे आचाऱ्याची भूमिका उत्तमपणे पार पाडत. आपली नोकरी, दुकान सांभाळून ते या कामात उत्साहाने मदत देत असत. लग्नाची तयारी तीन दिवस आधी सुरू व्हायची. मांडव झाल्यावर आंब्याचे डहाळे चढवणे, लाऊडस्पीकर लावून वातावरण निर्मिती व्हायची. लग्नाच्या दिवशी बहुधा दुपारी किंवा गोरज मुहूर्तावर अक्षता पडत. नवरदेव नवे कपडे आणि पारंपरिक बाशिंग बांधून मित्रांसमवेत मांडवात येई. नववधू ही नंतर येई. काही नववधू या आत्या किंवा मावशीच्या कडेवर बसून मांडवात एंट्री घेत. माईक वरून तांदळाची वेळ जवळ आली आहे, अशी सूचना गुरुजी देत. मंगलाष्टके म्हणून अक्षता पूर्ण होताच, बँन्ड, फटाके आपले अस्तित्व दाखवत. उपस्थितांना साखर वाटून तोंड गोड केले जाई. लग्नात मिळणारी आहेर पाकिटे हा अभिमानाचा विषय असे. सर्व आहेरकर्त्यांचे नाव, रक्कम सांगून आभार मानले जात. लग्नात जेवणाचा आग्रह व्हायचा. मांडवात जागा करून पंगती पत्रावळीत आस्वाद घेत. शिरा,भात आणि आमटी आणि लाडू यावर पाहुणे मंडळी खूष असत. लग्नासाठी शेजारचे घर हक्काने वऱ्हाडी मंडळीसाठी वापरले जाई. शेजारी हे लग्नात घरच्या प्रमाणे वावरत, मदत करत यात कोठेही नाराजी नव्हती. पाहुण्यांचे जेवण उरकल्यावर लग्नघरातील लोक जेवण करत. सायंकाळी देवदर्शनासाठी नवरा -नवरी बैलगाडीतून वाजतगाजत मारूती मंदिराकडे जात. बँन्डवर गाणी वाजवत छोटीसी वरातीचे समाधान यात दिसे. रस्त्यावर अनेक लोक नवरा-नवरीला गुळपाणी देऊन एकदा उखाणा घ्यायला सांगत. रात्री उशिरा हा सोहळा संपला की, दुसऱ्या दिवशी मांडवात चौकन्हाणं कार्यक्रम व्हायचा. याला शेजारीपाजारी उपस्थित राहत. तिसऱ्या दिवशी आवराआवर सुरू होई. शेजाऱ्यांच्या वस्तू लाडवासह परत केल्या जात. लग्न मुलाचे की मुलीचे असो,यात शक्यतो हात मोकळा ठेवून सहकार्यातून ते पार पाडले जाई. यात सामुदायिक आनंद हा सतत केंद्रस्थानी राहत होता.

   गणेशोत्सव, दसरा आणि संक्रांत हे तीन असे तीन सण होते की, यावेळी बहुतेकांना सर्वांच्या घरी जाण्याची संधी मिळायची. वारणा साखर कारखान्याचा गणेशोत्सव हा एक दहा दिवसांचा सोहळा असायचा. यात सर्वांची सामुदायिक उपस्थिती राहायची. परंतु घरोघरी गणेशोत्सव असल्याने, अनेकांच्या घरी ती पाहण्यासाठी मुले-मुली जात. सकाळ-संध्याकाळी आरत्यांना बोलावणे असायचे. यात मोठा उत्साह दिसायचा. नवरात्र लोक घरोघरी करत. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी आपट्याची पाने वाटताना घरोघरी हक्काने 'कडाकणी' खाऊ घातली जायची. मकरसंक्रांतीला लोक भेटत आणि तिळाचे लाडू प्रेमाने हातावर ठेवत. यामुळे कोणता मुलगा किंवा मुलगी काय शिकते,याची माहिती मोठ्यांना मिळत राहायची. एखाद्या मुला-मुलीचे अभ्यासात किंवा खेळात धवल यश असेल तर कौतुकाची थाप पाठीवर पडत असे.


   सामाजिक एकोपा हे सूत्र सर्वांच्या जगण्याचा भाग बनून राहिले होते. लग्न, मुंज, एखाद्या दुख:द प्रसंग यावेळी हा एकोपा अधिक दिसून येई. मी लहान असताना माझा थोरला भाऊ राजेंद्र याचे एप्रिल १९७६ मध्ये आजारी पडून निधन झाले होते. आई-वडील पूर्ण गळून गेले होते. घरात दोन लहान भावंडे होती. आमच्या कुटुंबाला सावरण्यासाठी मोठी मदत झाली. माझ्या घरासमोर हसत खेळत राहणारे निगडे आबा हार्ट अँटकने गेले, त्यावेळी ही लोक मदतीला धावले. कारखाना दवाखान्यात काम करणारे कंपौडर गलांडे काका रात्री अपरात्री मदत करत. ते पण असेच हार्ट प्रश्नामुळे अकाली गेले. त्यांच्या वेळी लोक एकोप्याने मदतीला धावले. अनेक कुटुंबाना कारखान्याने हात दिला. यातून कुटुंबे सावरून पुढे बहरत गेली. बेंगलोरी चाळीत राहणाऱ्या शेख मावशी आजही लक्षात राहिल्या आहेत, ते त्यांच्या दाई योगदान बद्दल. शेख मावशींनी अनेक महिलांना बाळंतपणात आणि नंतरही मदत देऊ केलेली होती.

   काँलनीतील हा कौटुंबिक सख्य, आपुलकी तेथे वाढलेल्या मुला-मुलीमध्येहीआलेली होती. शेजारी राहणाऱ्या काकू या 'मावशी' वाटत. त्याही शेजारच्या मुलांना त्याच आपुलकीची वागणूक देत. एखाद्या मुलाला किंवा मुलीला हक्काने काम सांगत. विशेषतः दिपावलीतील पदार्थांची तयारी आणि उन्हाळ्यातील वाळवण यात शेजारपाजाऱ्याची मुले असत. घरातून चिरणे आणून मुले-मुली करंज्या भरणे,त्याचे काट कापून देत. शेवया करताना पाटाखाली बसून त्या हाताने चाळत ताटात सोडणे, भरलेली ताटे सुकविण्यासाठी उन्हात ठेवणे, त्याची राखण करणे. यात कोणालाही कसलाही संकोच नव्हता. वारणेत 'लिज्जत पापड' उद्योग सुरू झाल्यावर अनेक कुटुंबात हे काम चाले. यातही वेळप्रसंगी शेजारील मुले- मुले मदत देत असत.अपेक्षित कामात फलप्राप्ती झाल्यावर मुला-मुलींना मावशी हक्काने खाऊ वाटत. कामातील हे सख्य मुला-मुलींच्या खेळातही दिसून येई. बहुतेक खेळ हे घरासमोरील मोकळ्या जागेत खेळले जात,ज्यात बऱ्यापैकी शारीरिक व्यायाम होत असे. दिपावली अगोदर मुले मातीचे किल्ले करत. हे सुध्दा पाचसहा मित्र एकत्र येऊन करत. आपल्या घरातील वस्तू त्यात वापरत. आमच्या शेजारी राहणाऱ्या रजाक उर्फ बाळू इनामदार या ज्येष्ठ मित्राने त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली होती. वह्याच्या पुठ्ठ्यांचा वापर किल्ल्याच्या भिंतीसाठी कसा करावा, हे त्याने शिकविले होते. किल्ला उपक्रमात मातीचे सैन्य लागे, लाईटची गरज भासायची आणि ती बहुधा मोठे लोक हौसेने पूर्ण करत. या कौटुंबिक वातावरणात भांडणे होत. काही काळ अबोला धरून लोक प्रेमाचा गोडवा टिकवण्यासाठी प्रयत्न करत.

   काँलनीने जगण्यातील चढउतार पाहिले. १९७२ मधील दुष्काळ ही यातील संस्मरणीय आठवण आहे. अन्नधान्य टंचाई, रेशन रांग, काटकसर हे तर त्यावेळी परावलीचे शब्द होते. शेतकरी सहकारी संघाच्या दुकानासमोर मोठ्या रांगा उभ्या असत. १९८० नंतर ही गर्दी 'वारणा बझार' कडे स्थलांतरित झाली. यात नंबरसाठी लहान मुले उभी राहत. दोन-तीन तासांनी यात नंबर लागे. दुष्काळी कामे यात सुरु झाली होती. यात मजुरांना दुपारी 'सुकडी' वाटली जायची. सुकडीचे तात्पुरते गोडाऊन हे आमच्या गल्लीत ई-९ मध्ये होते. येथे ट्रकने सुकडी येई आणि ती दैनंदिन स्वरूपात वितरित करत. सुकडी केंद्रात काम करणारे लोक हक्काने मदतीला बोलवत आणि सर्वांना सुकडी खाऊ घालत.


  काँलनीत वास्तव्य करणारा वर्ग हा मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गातील होता. त्यामुळे आर्थिक ओढाताण होताना दिसायची. 'उधारी' याशब्दाला बाजारात प्रतिष्ठा नव्हती. काही दुकानांत उधार व्यवहार होत. परंतु देणं वेळेत नसेल,तर दुकानदार अवमानित करत. यातच लोकांना वयात आलेल्या मुला-मुलींची लग्ने करावी लागली. यात कधी आनंद तर कधी कसोटीचे क्षण असत. हे अनुभव घेत तीन पिढ्यां येथे तयार झाल्या. यातील काही मुले-मुली शिक्षण आणि करिअरसाठी स्थलांतरित झाले. काहीजण आपली नोकरी आणि शेती सांभाळून आयुष्य पुढे नेत आहेत. यात एक वीण तयार होत गेली आणि ती शेजारधर्माची आहे. आज सुध्दा लोक भेटतात तेव्हा यावरच अधिक मनापासून बोलतात, यातच प्रेम, शेजारधर्म यांची प्रचिती येत राहते. माझ्या जगण्यात जो अनुभव येत गेला, त्यातील काही गोष्टी टिपण्याचा हा प्रयत्न आहे.


डॉ. संजय रत्नपारखी.