आज पाच सप्टेंबर म्हणजे,भारताचे
माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा
जन्मदिवस की,जो
'शिक्षकदिन' म्हणून
साजरा केला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं मानवी आयुष्यात ज्ञान, विकास
यांनी जोडलेले आहे. मी आमुक शिक्षकाचा विद्यार्थी किंवा आमुक एक माझा विद्यार्थी, ही
ओळख खूप महत्त्वाची असते. यात विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं जैविक नसूनही,ते
अधिक बांधलेले दिसते. मी लाँकडाऊन काळात वारणानगरशी निगडित काही आठवणी शब्दबध्द
करताना,
'आठवणींतील शिक्षक' हा
विषय जुन्या आठवणी जागवितांना लक्षात येऊन गेला. तो मांडण्यासाठी 'शिक्षकदिन' हा
सगळ्यात चांगला दिवस आहे.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप लोक येतात आणि
जातात. तसे शालेय जीवनापासून उच्च शिक्षणापर्यंत खूप शिक्षक येतात. यातील काही
अत्यंत प्रभावशाली असतात. ते आयुष्याला वेगळे वळण देऊन जातात. जो शिक्षक आपल्या
विकासासाठी प्रयत्न करतो,
आपल्यात प्रगती पाहतो, ते
शिक्षक हा आपला आठवणींतील अमूल्य ठेवा असतो. माझे प्राथमिक शिक्षण श्री
वारणा विद्यामंदीर,
माध्यमिक शिक्षण हे कोडोली हायस्कूल, ज्युनिअर
काँलेज वारणा महाविद्यालय तर पुढील पदवी आणि पदव्युत्तर
शिक्षण हे
अनुक्रमे छ.शहाजी महाविद्यालयात आणि राज्यशास्त्र
विभाग,
शिवाजी विद्यापीठ येथे झाले. या वाटचालीत अनेक
शिक्षक भेटले. त्यांनी माझ्या शिक्षणाला आणि प्रगतीला निश्चित अशी दिशा दिली. खरं
म्हणजे हे आयुष्यातील संचित आहे. यातील काही शिक्षकांना
आठवणींच्या स्वरूपात भेटण्याचा प्रयत्न आहे.
वारणा विद्यामंदीर या शाळेची
स्थापना साठच्या दशकातील आहे. वारणा सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ही शाळा
सुरू झाली. शाळा सुरु झाली त्यावेळी ती सातवीपर्यंत होती. त्यावेळच्या शासकीय
नियमाप्रमाणे इयत्ता चौथीला पूर्व प्राथमिक प्रमाणापत्र आणि
इयत्ता सातवीला प्राथमिक प्रमाणपत्र परीक्षा असे. या दोन्ही परीक्षा,केंद्र
परीक्षा असत. याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता चौथी आणि सातवीसाठी स्काँलरशिप
परीक्षेची संधी असे. त्यावेळी विद्यार्थ्यांना इयत्ता सातवी पर्यंत इंग्रजी भाषा
अध्ययनासाठी नव्हती. विद्यार्थी आठवीत गेल्यानंतर त्याला इंग्रजी भाषा शिकण्याची
संधी होती. आठवी ते अकरावी या चार वर्षांत इंग्रजी शिकून ते मँट्रिक परीक्षेला
बसत. अशा साठ आणि सत्तरच्या दशकात या शाळेला रघुनाथ पाटील सरांनी समर्थ नेतृत्व
दिले. वारणा विद्यामंदिर मध्ये येण्यापूर्वी पाटील सर जिल्हा परिषद शाळेत होते.
तेथून ते अनेक वर्षे डेप्युटेशनवर वारणेची शाळा सांभाळत होते. याशाळेची शैक्षणिक
पायाभरणी सरांनी मेहनतीने करून दिली. ते उत्तम शिक्षक असल्याने, मुख्याध्यापक
म्हणून जबाबदारी सांभाळून चौथीच्या स्काँलरशिप तुकडीला शिकवित. प्रत्येक शैक्षणिक
वर्षात अनेक विद्यार्थी स्काँलरशिप प्राप्त करत,यामागे त्यांची अपार मेहनत
असायची. शाळेत प्रार्थना सामुदायिक असे. यावेळी दिनाचे औचित्य साधून गोष्टी
स्वरूपात माहिती देत. मनाने ते अत्यंत प्रेमळ अभ्यासाबाबतत
कडक राहत. अधूनमधून अनेक वर्गांवर चक्कर मारत. एखादा धडा शिकवत किंवा गणित घालत.
पालकांशी अत्यंत अदबीने वागत.त्यामुळे विद्यार्थी, पालक
यांच्या मनात पाटील सरांबाबत आदरयुक्त भिती दिसायची. पाटील सर हे वारणा
विद्यामंदिरचे नेतृत्व करत असताना, त्यांना
सहकारी शिक्षक तसेच भेटले. मी शाळेत विद्यार्थी असताना डोंगरे नावाचे सिनिअर
शिक्षक होते. म.ग. कुलकर्णी, गजानन लोमटे, आर.डी.मोरे
यांच्या बरोबर महिला शिक्षकांमध्ये पाटील सरांच्या पत्नी, पाटील
मँडम,
मालती गुणे, जयमाला
पाटील ,देशपांडे
, महाजन
या महिला होत्या. बालवाडी छोटा आणि मोठ्या गटाची जबाबदारी प्रभू मँडमनी अनेक वर्षे
सांभाळली होती. शाळेत मला प्रामुख्याने लोमटे सर आणि गुणे मँडम यांच्या हाताखाली
शिकण्याची संधी मिळाली. माझ्या अभ्यास प्रगतीला गुणे मँडमनी वळण दिले.माझ्या
प्रत्येक गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे. हे लक्ष त्यांनी शेवटपर्यंत
ठेवले. मी वारणानगरहून बाहेर पडल्यानंतरही त्या माझ्या बद्दल चौकशी करत. मी १९९८
मध्ये मुंबई विद्यापीठ सेवेत रूजू झाल्याचे कळताच त्यांनी आशिर्वाद आणि शुभेच्छा
पत्र मला पाठवून दिले,
जे मी आजही सांभाळून ठेवले आहे. वारणा विद्यामंदिर
मध्ये संगीत शिक्षक म्हणून शंकरराव कुलकर्णी काम करत.ते अधूनमधून अनेक कवितांना
चाली लावण्यासाठी वर्गावर येत. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शंकरराव कुलकर्णी
हे
मुलांकडून फारच दर्जेदार सादरीकरण
करून घेत. आम्ही चौथीत असताना इंग्रजी भाषेची तोंड ओळख व्हावी म्हणून पानसरे
नावाच्या मँडम नियुक्त झाल्या होत्या. त्यांनीच आम्हाला इंग्रजीतील अक्षर
ओळख करून दिली.
मी माझे माध्यमिक शिक्षण हे कोडोली हायस्कूल मध्ये
पूर्ण केले. तत्पूर्वी दोन वर्षे वारणा विद्यालयात होतो. या कमी काळातही तेथे काही
चांगले शिक्षक भेटले. वारणा विद्यालयात तोरो मँडम या उत्तमपणे संस्कृत आणि मराठी
विषय शिकवत. मी त्यांच्या कडून मराठी विषय शिकलो. त्याचबरोबर भूगोल विषय शिकविणारे
मल्हारी सर हे आजही लक्षात राहिले. आलोणे मँडमनी आम्हाला सामान्यविज्ञान हा विषय
खूप चांगला शिकविला होता. हिंदी विषय हा परमणे सर खूपच रंजक पध्दतीने शिकवत. ते
शाळेत बऱ्यापैकी वरिष्ठ शिक्षक होते. इंग्रजीतील शब्द उच्चार आणि त्याची ब्रिटिश
पध्दती
याची तोंडओळख ग्रामोफोन
वापरून करून देणारे देवळालीकर, हे थोडे वेगळेच शिक्षक होते. एन.जी.पाटील सरांनी
इयत्ता पाचवीत आम्हाला इंग्रजी बरोबर क्रिकेटही शिकविले होते.
क्रिकेटची उत्तम जाण आणि विद्यार्थ्यांसाठी ते कोच होते. स्ट्रेट बँट कशी खेळावी,गोलंदाजी
कशी करावी,
याचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी दिले. ते मुलांकडून
लेदर बाँलवर क्रिकेट सराव करून घेत असत.
मी जून १९७७ मध्ये कोडोली
हायस्कूल मध्ये आलो येथे मला अध्ययनाची नवी दिशा मिळून गेली. शिक्षणाची आवड आणि
गती या शाळेच्या माध्यमातून मिळाली. कोडोली हायस्कूलची स्थापना स्वातंत्र्याच्या
आधी एक वर्ष म्हणजे १९४६ ची आहे. यंदा शाळेने पंच्याहत्तर वर्षात पदार्पण केले
आहे. माझे शैक्षणिक भाग्य हे की, अनुभवसंपन्न शिक्षकांच्या हाताखाली माध्यामिक
शिक्षण घेता आले. जी.डी.इंगवले सरांनी सर्वात जास्त काळ या शाळेचे नेतृत्व केले.
ते गणिताचे शिक्षक होते. जुन्या मँट्रिक पासून बीजगणित शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव
त्यांना होता. त्यांनी मला नववी आणि दहवीत बीजगणित शिकवले. विद्यार्थ्यांना
समजल्याशिवाय पुढे जायचे नाही, हे त्यांचे सूत्र होते. मग त्यासाठी गुरुवारी
दुपारी ,रविवारी
आणि सुट्टी दिवशी जादा तास घेत. गणित कसे वाचावे, ते
सोडविताना काय माहिती प्रश्नात आहे, हे
विद्यार्थ्यांना मांडायला लावून त्याला प्रोत्साहित आणि फोकस करत. विद्यार्थ्यांनी
पाटी पेन्सिल घेऊन सराव करावा, हा त्यांचा सल्ला मी अंमलात आणला होता. त्यामुळे
बीजगणित हा विषय आवडू लागला आणि अपेक्षित प्रगती परीक्षेत दिसू लागली. शाळेत
बी.एच.कणसे हे इंग्रजी विषयाचे शिक्षक अत्यंत कडक शिस्तीचे होते. कणसे सर हे अनेक
वर्षे शाळेची एन.सी.सी. पाहत होते. त्यामुळे शिकविण्यात अत्यंत फोकस राहत. इंग्रजी
शब्दउच्चार,व्याकरण
यात ते फारच वाकबगार वाटत. आम्हाला दहावी पर्यंत इंग्रजी विषय हा एस.ए. आपटे यांनी
खूप खेळीमेळीत शिकविला. त्यांनी व्याकरण पाया चांगला करून घेतला. इंग्रजी काळ पाट
करून घेतले. या गोष्टी दैनंदिन कामात आजही उपयोगी पडत आहेत. याच बरोबर ए.एम. पाटील
सर हे आम्हाला रसायनशास्त्र उत्तमपणे शिकवत. आमच्या तुकडी व्यतिरिक्त इतर
तुकड्यांना,
ते बीजगणित अगदी हसतखेळत शिकवत असत. मराठी, विषयासाठी
आम्हाला देसाई मँडमनी मार्गदर्शन केले. त्यांची शिकविण्यात सातत्य मूल्यमापन पध्दती
राहायची. जेवढा भाग शिकविला आहे, तेवढ्या भागावर लघुप्रश्न देत असत. धडा पूर्ण
होताना भरपूर बहुपर्यायी,
लघुप्रश्न होत. याशिवाय पुस्तकातील प्रश्न सोडवून
घेत. त्यामुळे धडा पूर्ण होताना, बरीच तयारी होऊन जाई. सामाजिकशास्त्रे विषयात
इतिहास,
भूगोल, नागरिकशास्र
यांचा समावेश होत असे. शाळेतील वास्कर सरांनी आम्हाला इतिहास,नागरिकशास्त्र
शिकवले ,तर जाधव
सरांनी भूगोल विषय शिकविला. वास्कर सर हे पुस्तक कधीही हातात न घेता,ओघवत्या
शब्दांत इतिहास शिकवत. शिकवितांना अधूनमधून बहुपर्यायी प्रश्न आणि त्याची उत्तरे
सांगत. जाधव सर हे विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेत. शाळेत अवांतर वाचन,चर्चा
इंग्रजी वाचन याबाबत बी.टी. आवळे सरांचे सतत प्रोत्साहन लाभले. मला त्यांनी सतत
नवनवे मार्गदर्शन दिले. ते स्वतः उत्तम इंग्रजी उत्तम वाचक होते. ते सातत्याने
नव्या गोष्टी सांगत असत. त्यामुळे अवांतर वाचनाची बऱ्यापैकी आवड निर्माण होत गेली.
भूमिती आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय सोळसे सरांनी मेहनतीने शिकविले. ते सतत
शाळेच्या प्रयोगशाळेत राहत असत. कोडोली हायस्कूल हे वारणा परिसरातील सर्वात जुनी
शाळा आहे. त्यामुळे त्यावेळी ही शाळेत शिक्षक संख्या मोठी होती. यामध्ये काईंगडे
हे उत्तम मराठी तर गुळवणी सर हे शारीरिक शिक्षक होते. काईंगडे सरांनी मराठी
चित्रपटातील
मुकपट आणि बोलपट जमाना पाहिला होता. चित्रपट
इतिहासाची चांगली माहिती त्यांना माहीत होती.
दहावी उत्तीर्ण झाल्यावर
ज्युनिअर काँलेज शिक्षण विज्ञान शाखेतून आणि ते वारणा महाविद्यालयातून घेतले. हा
एक महत्त्वाचा टप्पा होता. इंग्रजी माध्यम, बारावीतील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
यांची
काठिण्यपातळी हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांसमोर
आव्हानच होते. त्यावेळी बारावी परीक्षेच्या गुणांवर मेडिकल आणि इंजिनिअरिंगची
प्रवेश निश्चित होत. अनेक मुले आणि मुली ढोरमेहनत आणि पाठांतर यावर बाजी मारून
जात. मेडिकलसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि इंजिनिअरिंगसाठी वालचंद काँलेज
किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे प्रवेश मिळणे याला मोठी
प्रतिष्ठा होती. आम्हाला या दोन वर्षात वारणा महाविद्यालयातील खूप
चांगले शिक्षक लाभले होते. प्रा.के.एस.शेवडे हे वरिष्ठ महाविद्यालयात गणित
विभागाचे प्रमुख होते. त्यांनी बारावीत गणित शिकविले. या शिवाय प्रा. भा.रा. बापट, प्रा.
म्हस्के हे शिक्षक गणितातील काही भाग शिकवत असत.यात शेवडे सर हे फारच कडक राहत.
भौतिकशास्त्र विषयासाठी प्रा.माने, प्रा.
कुलकर्णी,
प्रा. किबिले हे शिक्षक लाभले. रसायनशास्त्रासाठी प्रा.पी.आर.
कुलकर्णी,
प्रा.दामले आणि प्रा.जाधव हे शिक्षक होते. यात
आँरगँनिक केमिस्ट्री हे प्रा. कुलकर्णी सर धमालपणे शिकवित. मी बारावी पूर्ण करत
असतानाच आपला ओढा हा सामाजिकशास्रे,भाषा विषयांत असल्याचे
प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झाल्यावर राज्यशास्त्र विषयात पदवी
आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
छ.शहाजी महाविद्यालयात शिकत
असताना तेथे कला शाखेसाठी खूपच अनुभवी आणि विद्यार्थीप्रेमी शिक्षक भेटले.
साहित्यिक चंद्रकुमार नलगे,
इतिहास संशोधक डॉ. जयशिंगराव पवार, इंग्रजी, संस्कृत, मराठी
अर्धमागधी भाषेचे अभ्यासक प्राचार्य कंटाबळेसर,डॉ.
दिलीप पंगू,
प्रा. आनंदराव वैराट, राज्यशास्त्रासाठी
प्रा. र.घ. वराडकर हे शिक्षक होते. इतिहास विषय वैराट सर अतिशय उत्तमपणे
शिकवत. त्यांची हातोटी ही खूप प्रभावी आणि मुद्देसूद असायची. मी वराडकर सर आणि
प्रा. मोरे यांच्याकडून राज्यशास्त्र समजून घेतले. राजकीय विचारवंत, आधुनिक
राजकीय विश्लेषण,
महाराष्ट्र राजकारण या अभ्यासात वराडकर सरांनी
योग्य दिशा दिली. आमचे पदवी शिक्षण पूर्ण होताना पंचायत राज्य पध्दतीवर प्राचार्य
पी.बी. पाटील समितीचा अहवाल आला होता. यावर सरांनी पुढाकार घेऊन कोल्हापूर जि.प.
कार्यकारी अधिकाऱ्याची भेट आणि चर्चेची संधी आम्हाला मिळवून दिली होती.शहाजी
काँलेजचे ग्रंथालयात ब्राम्हणेतर चळवळीतील काही जुन्या वर्तमानपत्रांचे अंक होते.
ते विद्यार्थीदशेत वाचायला मिळाले. संशोधनपर पुस्तके वाचण्याची सवय याच काळात अधिक
विकसित होत गेली.
शिवाजी विद्यापीठाच्या
राज्यशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली. विद्यापीठ वातावरणात जाऊन
शिक्षण प्राप्त करणे,
हा अनुभव खूप वेगळा असतो. खरं म्हणजे ही शैक्षणिक
अनुभव विश्वात मोठी वाढ असते. डॉ. के.के. कावळेकर, डॉ.
अशोक चौसाळकर,
डॉ. गोपाळ गुरू, डॉ.
सुरेंद्र जोंधळे आणि डॉ. श्रीमती वासंती रासम या शिक्षकांनी आम्हाला
राज्यशास्त्राचे अध्यापन केले. डॉ. कावळेकर सर हे त्यावेळी विभागप्रमुख होते आणि
ते लोकप्रशासनशास्त्र शिकवित. डॉ. अशोक चौसाळकर सर यांनी राजकीय सिध्दांत, राजकीय
विचार शिकविले. भारतीय राजकारणाची चिकित्सा,जात-धर्म राजकारण, राष्ट्रउभारणी, हे
नवे विषय डॉ. गोपाळ गुरु सरांनी समजावून सांगितले. डॉ. जोंधळे सरांनी आंतरराष्ट्रीय
राजकारण तर डॉ. रासम मँडमनी आंतरराष्ट्रीय संघटना हे अभ्यासक्रम शिकविले.
राज्यशास्त्र विभागात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात खूप आत्मयितेचे संबंध होते
आणि आजही ते टिकून राहिले. विभागात डाटा बँक होती. यात विविध राजकीय विषयांवर
माहिती संकलित केली जात असे. त्याकाळी विभागात विविध राज्यांतून इंग्रजी
वर्तमानपत्रे येत. यात आम्हाला द हिंदू, टेलिग्राफ, टाइम्स
आँफ इंडियाचे मुंबई,
नवी दिल्ली, अहमदाबादचे
अंक वाचायला मिळत. भरपूर वाचा आणि प्रश्न विचारत राहा,हा
संदेश याच विभागात आम्हाला मिळाला. राज्यशास्त्र विभागात सक्रिय राजकारण करणारे
नेते,
अभ्यासक यांची व्याख्याने ऐकण्याची आणि
त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पदव्युत्तर पदवी बरोबरच अनुभव विश्व
वाढवून घेता आले.याकामी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत गेले, ही
खरी मिळकत.
मी माझे पीएच.डी संशोधन पदवी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून केले. दूर आणि मुक्त शिक्षण
पध्दतीत काम करत असल्याने,यातील
एखाद्या शैक्षणिक समस्येवर काम करावे हा विचार होता. मी स्वतः या विद्यापीठात काही
काळ नोकरी केली होती. मुंबई विद्यापीठात आल्यावर डॉ. ना.रा.चौधरी सरांनी मला यात
बहुमोल मार्गदर्शन दिले. तत्कालीन कुलगुरू प्राचार्य अशोक प्रधान सरांनी मला
आंतरविद्याशाखीय अभ्यास करा,हा मोलाचा सल्ला दिला होता. त्यातून दूर शिक्षण
पद्धतीतील गुणवत्ता संवर्धन अशा नव्या क्षेत्रात काम करू शकलो. नवे विषय वाचने, ते
समजून घेणे ही तशी मानसिक पातळीवर अवघड प्रक्रिया असते. परंतु अशा संशोधन कामातून
तशी मानसिकता तयार करण्यात थोडाफार यशस्वी झालो,हे श्रेय मार्गदर्शकांचे
आहे.
श्री वारणा विद्यामंदीर ते
विद्यापीठीय शिक्षण आणि संशोधन हा विद्यार्थीदशेतील
शैक्षणिक प्रवास
कधी अतिशय निराशाजनक तर कधी उत्साह वाढविणारा होता.
आमच्या घरी आणि गावीही बहुतेक विद्यार्थी हे प्रथमच शिक्षण घेत होते. घरात शिक्षण
वारसा नव्हताच.आई-वडिलांना शिक्षणाच्या मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक अडचणीतून
मार्ग काढण्यासाठी शिक्षक पाठीशी उभे राहिले. त्यांची थाप, प्रोत्साहन
यामुळे माझ्या सारखे अनेक विद्यार्थी पदवीधर, पदव्युत्तर
आणि पीएच.डी सारखे संशोधन काम करू शकले. माझ्या यातील काही आठवणी यात
मांडल्या. तशा अनेकांच्या यात विविध आठवणीं असू शकतात. आज शिक्षकदिनाच्या
निमित्ताने आठवणींतील शिक्षकांचे स्मरण करण्याची संधी घेत आहे इतकचं. आयुष्यात
भेटलेल्या सर्व शिक्षकांना विनम्र नमस्कार!
डॉ. संजय रत्नपारखी