आँनलाईन कार्यसंस्कृती हा आपल्या प्रगतीचा टप्पा आहे.
कोविड-१९ च्या प्रभावात याच टप्प्याने आपले व्यवहार जिवंत ठेवले आहेत. भविष्यात
आँनलाईन कार्यसंस्कृती नवं प्रारुप धारण करेल. यात विरोध करण्यापेक्षा नव्या
गोष्टी शिकण्यावर भर हवा आहे. नवं क्षितिज आपल्याला मोठी संधीही देईल.
प्रास्ताविक
एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात जागतिकीकरण आणि
खाजगीकरण याने कमालीचा वेग पकडला होता. आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिका व चीन
यांच्यातील स्पर्धा वाढत असताना,
डिसेंबर २०१८ नंतर हे चित्र
पूर्ण पालटून गेलं. 'कोविड-१९' नामक नव्या विषाणूने या
स्पर्धेची गती मंदावून टाकली. चीन मध्ये वाहून शहरात बराचकाळ टाळेबंदी लागली.
युरोपात इटली,जर्मनी, फ्रान्स,इंग्लंड या
देशातही भयावह स्थिती निर्माण झाली. अमेरिकेतही सुसज्ज आरोग्य यंत्रणा कोविड १९
पुढे निषभ्र ठरली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लाखो अमेरिकन नागरिकांना जीव गमवावा
लागला. भारतातही मार्च १९ नंतर राष्ट्रीय लाँकडाऊन करावा लागला. तो सहा महिने
राहिला. त्यानंतर ही लाट ओसरली आणि काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले. जानेवारी २१ नंतर
दुसऱ्या लाटेने प्रवेश करून अक्षरशः हाहाकार उडवून दिला. या दरम्यान लस आली होती.
लसीकरण प्रक्रिया सुरु असताना रुग्ण वाढत गेले. यात रूग्णालय व्यवस्था फारच तोकडी
दिसून आली. लाखो लोक कोरोना बाधित झाले. अनेकांना आँक्सिजन अभावी जीव गमवावा
लागला. जगभर कोरोनाचे थैमान सुरू असताना, तंत्रज्ञान साह्याने व्यवहार, बाजार
जगण्याची धडपड करत राहिले. यात शाळा, आँफिसेस,व्यापार
आँनलाईन होत गेला. अनेक परीक्षा मंडळांना दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या
नाहीत. भारतात प्रथमच परीक्षा न घेता; विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे लागले
आहे. या झपाट्याने बदलत्या परिस्थितीत शासकीय आणि खाजगी आस्थापना यांनी 'वर्क फ्राँम
होम' हा आँनलाईन पर्याय राबवून पाहिला. सध्या कोविडची
तीव्रता कमी असली,तरी हा पर्याय खाजगीक्षेत्रात जोमाने काम करताना दिसत
आहे. या काम करण्याच्या नव्या पध्दतीने काही सुकरता, तर काही असुकरता निर्माण होत
आहे. 'वर्क फ्राँम होम' ही नवी कार्यसंस्कृती कशी काम
करते आहे? ती कितपत पूरक आहे? यातील प्रश्न, समस्या आणि
उपाययोजना यांचा विचार लेखात करणार आहे.
वर्क फ्राँम होम ही नवीन कार्यशैली एका रात्रीत तयार
झाली नाही. गेल्या वीस वर्षांत वाढलेला संगणक वापर, ईमेल व्यवहार, आँनलाईन मध्ये
लोकांनी स्वतः ला सरावत नेणे,
वाढती सामाजिक माध्यमे, व्यक्त
होण्यासाठी लोकांना वैयक्तिक पातळीवर मिळालेले स्वातंत्र्य, यातील
सर्जनशीलता आणि समस्या यांनी ही पार्श्वभूमी तयार करण्यास मोठा हातभार लावला आहे.
कोविड-१९ चा प्रसार झाल्यानंतर यास अधिक बळकटी मिळाली. आँनलाईन व्यापार,ग्राहक यांना
यात ग्लँमर मिळाले. आजही कोणतीही खरेदी करताना आधी ती वस्तू अँमेझान अँपवर शोधली
जाते. याशिवाय आपल्या स्मार्ट मोबाईल मध्ये अनेक अँप उपलब्ध आहेत की ज्यातून
पर्यायी शक्यता पडताळून पाहता येते. याच वातावरणात संपूर्ण जग २०२१ मध्ये वावरत
आहे. त्यामुळे भविष्यात यात कमालीची वाढच झालेली दिसेल. कोविड -१९ पहिल्या आणि
दुसऱ्या लाटेत आँनलाईन व्यवहाराने अर्थव्यवस्था जिवंत ठेवली आहे. अनेक पारंपरिक
अर्थव्यवहार हे बंद पडले आहेत किंवा ते बंद पडण्याच्या मार्गावर दिसतात.
सेवाक्षेत्र झपाट्याने पुढे जात आहे. अनेक खाजगी आस्थापना आता आँनलाईन वा हायब्रीड
प्रारूपात परिवर्तित होत आहेत. शासकीय व्यवहार आता त्यांच्या कूर्मगतीने
आँनलाईनकडे निघाले आहेत. ही झपाट्याने बदलणारी परिस्थिती आणि पर्यावरण आता कोणालाच
रोखता येणार नाही, एवढा पल्ला आँनलाईन व्यवस्थेने पार केला आहे. आँनलाईन
व्यवस्थेचे खाजगी आणि शासकीय आस्थापनावर मोठ परिणाम झाले आहेत. त्यामुळे रोजगार
संधी कमी होत आहेत, हे नाकारता येत नाही. सध्या या दोन्ही व्यवस्था कशा
प्रकारे वर्क फ्राँम होम ही कार्यसंस्कृती राबवित आहेत, हे या
निमित्ताने विचारात घेऊ.
खाजगीक्षेत्र
खाजगीक्षेत्र हे मूळातच स्पर्धात्मक पध्दतीने चालते आणि
ते तसे चालायला हवे आहे. नव्या कार्यसंस्कृतीशी जुळवून घेण्यात हे क्षेत्र अग्रेसर
राहिले आहे. खाजगीक्षेत्रात आँनलाईन संकल्पना रूजली आहे, असे म्हणता
येईल.त्याची काही कारणे आहेत. या पद्धतीत आँफिस खर्च वाचतो. आँफिस सुशोभीकरण, फर्निचर यावर
खर्च नाही. या पद्धतीत कमी मनुष्यबळ लागते.त्यामुळे कर्मचारी वेतनखर्च कमी, जे काम करत
आहेत, त्यांच्या वेतनात कपात करून कंपन्यानी आपले पैसे
वाचविले. आँनलाईन कामात कर्मचारी चौवीस तास उपलब्ध राहतो. त्याला रात्री सुध्दा
आँनलाईन काम करावे लागते. कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी शिपाई ठेवण्याची आवश्यकता
नाही. कंपनीतील बडे अधिकाऱ्यांच्या गाड्या काढून घेतल्या गेल्या. प्रवास भत्ते बंद
झाले. यामुळे खाजगी कंपन्याना बराच पैसा वाचविता आला आहे. बहुराष्ट्रीय आणि मोठ्या
कंपन्याची आँफिसेही मुंबई मध्ये नरिमन पाँईट आणि बीकेसी परिसरात आहेत. यास
कोट्यवधी रुपये भाड्यावर खर्च होतात.याशिवाय कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा, पंखे यासाठी
मोठा खर्च येतो तो सुद्धा वाचला आहे. खाजगी कंपन्यांनी आता आँफिस ही संकल्पना
निकाली काढली आहे.संगणक आणि इंटरनेट या माध्यमातून कार्यालय कामकाज सुरु आहे.
सध्या कोणत्याच खाजगी कंपनीत रोजगार कायमस्वरूपी नाहीत. करारधीन कर्मचारी काम
नाकारत नाहीत.तसेच युनियनकडे जाऊ शकत नाही. शासकीय क्षेत्रात रोजगार संधी नाहीत.
त्यामुळे कामावर येणारा माणूस बाहेर जावू शकत नाही. आँफिस ही संकल्पना बदलत
असल्याने, कँन्टिन सुविधा यातील सवलत देण्यासाठी जे पैसे खर्च होत
होते,ते पैसे वाचले आहेत. याशिवाय कंपनीच्या सोयीने नियम
बनवून कर्मचारी धाकात ठेवून त्याच्याकडून पाहिजे तसे काम करून घेता येते. एकूणच
आँनलाईन कामकाज पध्दती ही विविध मार्गांनी खाजगी आस्थापनाच्या पथ्थावर पडली आहे.
आता आँनलाईन कार्यपद्धती झपाट्याने आपला विस्तार करत आहे. भविष्यात खाजगी क्षेत्र
हे पूर्ण आँनलाईन किंवा हायब्रीड प्रारुपात काम करताना दिसेल.
कामे
कोविड-१९ येण्यापूर्वी हे क्षेत्र आँनलाईन व्यवस्थेकडे
झपाट्याने जात होते. टाळेबंदी जाहीर झाल्यावर या क्षेत्राने अधिक गती घेतली.
बहुराष्ट्रीय कंपन्या, खाजगी बँका, औषध कंपन्या याशिवाय मध्यम आणि
छोट्या कंपन्यानी आँनलाईन मोड पसंत केला. सकाळी आठ वाजता लँपटाँपच्या कँमेरासमोर
बसून अधिकारी आणि कर्मचारी काम करू लागले. मेल पाठविणे, आँनलाईन
मिटिंग मध्ये सहभागी होणे. यात ठराविक अशी वेळ नाहीच. आजही बरेच लोक दहा तासाहून
अधिक काम करत आहेत. याशिवाय रात्री अपरात्री सुध्दा कामकाजात सहभागी व्हावे लागते.
घरीच आँफिस राहिल्याने प्रवास नाही. घरची साधनसामग्री वापरून उपस्थिती ठेवायची
आहे. घरात एक बसण्याची ठराविक जागा. समोर लँपटाँप आणि कानाला इअर फोन हे चित्र
घरोघरी दिसत आहे. यात आता लोक वैतागून गेले आहेत. परंतु पर्याय नसल्याने ते
परिस्थिती रेटत आहेत. लोकांचा प्रवास आणि सामाजिक संपर्क कमी होत आहे. आँनलाईन संपर्क
हाच त्यांना जोडणारा दुवा मदत करत आहे. गेले दीडवर्ष कोविड प्रभावात अनेक कंपन्या
बंद पडल्या. अनेक कंपन्यानी कर्मचारी कमी केले. काही कंपन्यांनी वेतनात कपात केली.
त्यामुळे खाजगी क्षेत्रातील लोकांसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. मुद्रित माध्यमात
वर्तमानपत्रे मोठी भूमिका बजावत आले आहेत. त्यांनीही आँनलाईन स्वरूप स्वीकारून
आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. संपादक घरी राहून अंकाची जोडणी करत आहेत. उद्योग, व्यापार कमी
झाल्याने,त्यांना जाहिराती मिळत नाहीत. याचा परिणाम नोकर कपातीत
होऊन अनेकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बँका आणि फिल्म उद्योगही असाच
भरडून निघताना दिसतो आहे. कोविडची परिस्थिती किती काळ राहील याची निश्चिती नाही.
दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट प्रवेशकर्ती झाली आहे. सध्या लस आणि सुरक्षित जीवन
जगणे याच दोनच गोष्टी हातात आहेत. त्यांना सांभाळून खाजगीक्षेत्र भविष्याची वाट
शोधत आहे.
शासकीय क्षेत्र
शासकीय क्षेत्र म्हणजे विलंब आणि लालफितीचा कारभार ही
ओळख जरी असली, तरी कोविड-१९ काळात काही कामे वाखाणण्याजोगी झालेली
आहेत. विशेषतः शासकीय वैद्यक क्षेत्राने निकाराची झुंज देऊन लाखो लोकांचे जीव
वाचवले आहेत. गेल्या वीस एक वर्षात शासकीय कामकाज आँनलाईन झाले आहे. यातील
तांत्रिक बांधणीचा वापर यंत्रणेला करता आला. कोविड रुग्णालयात आँनलाईन यंत्रणेचा
प्रभावी वापर प्रस्तुत लेखकाने जवळून घेतला.कोविडच्या पहिल्या लाटेत अत्यावश्यक
सेवा वगळता; इतर कार्यालय बंद होती. परंतु दुसऱ्या लाटेत शासकीय
यंत्रणा २५% आणि ५०% कर्मचारी उपस्थित ठेवून कामे करत होती. आँनलाईन यंत्रणेसाठी
मोठी व्यवस्था लागते. ही यंत्रणा सर्वच कार्यालयात उभी असे नाही. परंतु जी उपलब्ध
आहे,त्यात व्यवहार सुरू राहिले. कोविड प्रभावात खाजगी
क्षेत्रात हादरे बसत असताना,
शासकीय कर्मचारी मात्र निर्धास्त
राहिले. केवळ 'शासकीय' असल्याने लोकांचे रोजगार शाबूत
राहिले आहेत. शासकीय यंत्रणेत संगणक वापर हा फारसा प्रशिक्षित स्वरूपात नाही.
त्यामुळे मर्यादित कौशल्याच्या आधारावर यंत्रणा काम करत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना
आँनलाईन कार्यसंस्कृती भावली असे नाही. शासकीय यंत्रणा संगणक यंत्रणा
राबविण्यासाठी खाजगी सेवाक्षेत्रावर अवलंबून आहे. किंबहुना या सेवा क्षेत्राने
व्यवस्था ताब्यात ठेवलेली आहे. शासकीय यंत्रणेत संगणक वावर आणि वापर हा टंकलेखन, मेल
आदानप्रदान यापलीकडे फारसा नाही. हे हातळण्यासाठी जी यंत्रणा लागते, ती पुरेसी
नाही. शिवाय त्याची देखभाल नीट नाही. यामुळे अनंत अडचणींना समोरे जात आँनलाईन
व्यवस्था पुढे जात आहे.
शासकीय व्यवस्थेस आपली
कार्यक्षमता वाढविण्याची संधी घेता आली पाहिजे. याबाबत फारसी स्पष्ट दिशा दिसत
नाही. चर्चा आणि बोलबाला आहे. प्रत्यक्ष कार्यवाहीत शासन आपले स्वतः चे प्रशासन
सोडून बाह्य कंपन्याच्या बळावर समाधान मानत आहे. शासन व्यवस्था ही नेहमीच
कल्याणकारी राज्य संकल्पनेशी बांधील राहायला हवं आहे. खाजगीकरण काळातही शिक्षण, आरोग्य हे
शासनाचे विषय असायला हवेत. आता शासन
अनेक गोष्टींतून निवृत्त होऊ पाहत आहे, हे चुकीचे आहे. कोरोनाने आँनलाईन
कार्य संस्कृतीची संधी दिली,
तसा आरोग्य प्रश्न ऐरणीवर आणला
आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहिले,तर प्रगतीचे टप्पे पार करता
येतील. बदलत्या काळात शासकीय व्यवस्थेस आँनलाईन कार्यसंस्कृती आणि आरोग्य हे दोन
विषय समान पातळीवर सांभाळायचे आहेत.
शिक्षणक्षेत्र
कोविड-१९ च्या प्रभावात शिक्षणक्षेत्राचे फार मोठे
नुकसान होत आहे. गेल्या दिडवर्षात शिक्षण व्यवस्था ही ठप्प आहे. शाळा, काँलेजस बंद
आहेत. आँनलाईन शिक्षण आणि परीक्षा यांचा वापर करून हे क्षेत्र सांभाळता आलेले
नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा न घेताच; विद्यार्थ्यांना
उत्तीर्ण करावे लागले आहे. महाविद्यालयीन आणि विद्यापीठ परीक्षा या बहुपर्यायी
पध्दतीने घेतल्याने, विद्यार्थी हे शंभर गुणापर्यत जावून पोहचले आहेत.
यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात फारशी सुलभता नाही. शिक्षणक्षेत्रात
तंत्रज्ञान वापराचा फार बोलबाला सुरू असतानाच, व्यवस्था आणि तिचे लाभार्थी हे
किती तकलादू ठरु शकतात, हे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणात
तंत्रज्ञान वापर हा विद्यार्थी,
शिक्षक आणि संस्था यांना फारसा
सुसह्य वाटलेला नाही. विद्यार्थी-शिक्षक संवाद तुटत आहेत. दिवसांगणिक चार-पाच तास
आँनलाईन राहणे हे शक्य दिसत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही घटक शिकवणे आणि
शिकणे यातील गांभीर्य गमावत आहेत,
हे वास्तव नाकरता येत नाही.
आपल्याकडे मोबाईल, लँपटाँप यांचा वापर शिक्षणक्षेत्रात फारच प्राथमिक
पातळीवर आहे. शिक्षक हे तंत्रज्ञानस्नेही नाहीत. विद्यार्थी हे फक्त व्हाँटसअँप,फेसबुक
यापलिकडे जायला मागत नाहीत. शैक्षणिक संस्थाकडे तांत्रिकबळ नाही. मोबाईलच्या
छोट्या पडद्यावर सध्या शाळा,
महाविद्यालये, विद्यापीठे तग
धरून काम निभावत आहेत. शिक्षक आपली पीपीटी विद्यार्थ्यांना शेअर करताना दिसतात.
विद्यार्थ्यांना यात शिकण्याचा आनंद मिळत नाही. कोणत्याही शिक्षणव्यवस्थेसाठी 'वाचन,' 'लेखन,'आणि 'श्रवण'
ही तीन मूलभूत कौशल्य आहेत. यात
श्रवण वगळता इतर दोन कौशल्यांचा वेगाने संकोच दिसत आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट
प्रतिक्षेत उभी आहे. ही किती प्रभाव टाकेल,याचा अंदाज करता येत नाही.
त्यामुळे नजिकच्या काळात शैक्षणिक व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊन कार्यरत राहील, असे दिसत
नाही.कोरोनात्तर काळात शैक्षणिक व्यवस्थेला झालेले नुकसान भरून काढावे लागेल.ती
आव्हाने मोठीच असतील, यात शंका नाही.
सिंहालोकन
जागतिकीकरण आणि खाजगीकरण यांच्या फायदा व तोट्याची
चर्चा करताना कोविड पूर्व आणि कोविड उत्तर अशी विभागणी करावी लागेल. संगणक,नेटवर्क ही
आजच्या जगण्यातील बलस्थाने बनली आहेत. कोणताही देश अगदी पूर्वीचा साम्यवादी देशही
हे बलस्थान नाकारणार नाही. कोविड-१९ मुळे जगभरातील आँनलाईन व्यवहार गतिमान होण्यास
मदतच झाली आहे. भारतात संगणक आणि आँनलाईन कार्यसंस्कृती येण्या अगोदरही बेकारी
होती.तिची कारणे वेगळी होती. आता शिक्षण विकासातून यातील काही कारणांवर मात केली
गेली आहे. इंग्रजी शिक्षणामुळे संगणक हाताळणीत आपले युवक पुढे आहेत. आयटी
क्षेत्रातील प्रगती हे त्याचे यश मानता येईल. त्यामुळे भविष्यात आँनलाईन कार्य
संस्कृती ही भरारी घेताना दिसेल. यातील नवं क्षितिज आता खुणावत आहे. त्याला गवसणी
घालण्यात, नवी सर्जनशीलता जन्माला येऊ शकते.
डॉ. संजय रत्नपारखी
Email:rsanjay96@hotmail.com