आईने हे जग सोडून आता महिना पूर्ण झाला. विश्वास बसत नाही. आईची ओढ ही बहुधा ती गेल्यानंतर अधिक जाणवत राहते. गेली तीन वर्षे तिची तब्येत फारशी चांगली नव्हती. जानेवारी नंतर तिने अंथरूण धरले आणि त्यातून ती बाहेर आली नाही. मी नोकरी निमित्ताने मुंबईत. दिनेश आणि दिप्तीने आईची सेवा केली. मी अधूनमधून घरी वारणानगरला आईला भेटायला जायचो. शेवटची भेट मे महिन्यात झाली. ती त्यानंतर भेटली नाही. आईने आमच्यासाठी खूप काही केले. निगुतीने संसार सांभाळून तीन मुले मोठी केली. बाबांच्या नोकरीत दिवसरात्र सोबत राहिली. मला मोकळा श्वास घ्यायला कोडोली हायस्कूलच्या माध्यमातून संधी दिली. माझ्यावर कायम विश्वास ठेवला. मी तो अधिक सार्थक करण्याचा प्रयत्न करत राहिलो, याचे तिला मोठे समाधान होते. वारणानगरहून बाहेर पडून मला तीस वर्षे झाली. या तीस वर्षात आई मनाने माझ्या बरोबर राहिली. १९८९ मध्ये वारणेत घराचे काम सुरु झाले आणि मी बाहेर पडलो.घराची जागा आणि पूर्तता यात आईचे योगदान मोठे.
आई -वडिल हे जगण्यातील मोठी शक्ती. ती काळाने गेल्या महिन्यात कायमची काढून घेतली. काल हा सर्वांसाठी नियम आहे, तो म्हणून आम्ही भावंडांनी स्वीकारला. बाबा २०१० मध्ये गेले आणि त्यानंतर ९ वर्षांनी आईने जग सोडले. आता वाकून नमस्कार करायला हक्काचे पाय मिळणार नाहीत, या कल्पनेने जीव कासावीस होतो. आत्माप्रवास ही आपल्यासाठी एक कल्पना आहे. या कल्पनेचा आधार घेऊन मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करीन की, आमच्या आई -बाबांना आमच्याकडे पाहण्यासाठी संधी दे.
संजय भीमाशंकर-पुष्पा रत्नपारखी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा