मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

तंबू थिएटरमधील भावविश्व




   कोडोली हे गाव म्हणजे पन्हाळा तालुक्याचा पूर्व भाग. गावापासून दहा किलोमीटरवर वारणानदी आणि सांगली जिल्ह्याची हद्द. पूर्वेकडे हातकणंगले आणि पश्चिमेला रत्नागिरीकडे जाण्याचा मार्ग. शेती हा येथील मुख्य व्यवसाय. सुपीक आणि बागायती शेतीमुळे सधनतेचा वारसा लाभलेले. स्वातंत्र्यपूर्व काळात हा कोल्हापूर संस्थानचा भाग होता. या संस्थानात जी सधन गावे होती, त्यात कोडोली एक होते. संस्थान काळात कोडोलीत नगरपालिका होती. गुरुवारी आठवडी बाजार भरत असल्याने, व्यापारी उलाढाल येथे सातत्याने सुरु आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मिशनऱ्यांनी या गावात शाळा आणि दवाखाना सुरु केला होता, त्यामुळे आसपास गावातील लोक, विद्यार्थी यांची ये-जा राहिली. कोडोली शिक्षण मंडळाने १९४६ साली माध्यमिक स्तरावरील पहिली शाळा कोडोली हायस्कूल या नावाने सुरू केली. यंदा हे हायस्कूल आपले ७५ वे स्थापना वर्ष साजरे करीत आहे. कोडोलीच्या पूर्वेस दोन कि.मीटरवर, तात्यासाहेब कोरे यांनी १९५९ मध्ये वारणा सहकारी साखर कारखाना सुरु करून विकासपर्व सुरू केले. यातूनच आजचे वारणानगर आणि येथील उपक्रम सुरू झाले. साठच्या दशकापासून वारणा-कोडोली परिसर महाराष्ट्र आणि देशात चर्चेत आला. आजही वारणानगर हे कोडोली ग्रामपंचायत हद्दीत येते. येथील लोकसंख्या सत्तर हजारच्या आसपास गेली आहे. महाराष्ट्रात ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्यात कोडोली एक आहे.

   जुन्या काळापासून रसिक गाव अशी एक वेगळी ओळख सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात मेळे, तमाशे येथे येत असत. शाहीर पठ्ठेबापूराव कुलकर्णी आणि पवळा यांचा तमाशा फड काही दिवस येथे मुक्कामाला होता. पठ्ठेबापूरावाची लावणी आणि पवळाचे सादरीकरण यात रात्री सुरू झालेला कार्यक्रम पहाटे संपे, अशी माहिती काही जुन्या लोकांकडून ऐकायला मिळालेली आहे. कोडोली गावात सिनेमा हा तंबूत सुरु झाला,तो काळ साठच्या दशकातील आहे. त्याअगोदर काही सिनेमा रसिक हे मूकपटांपासून चित्रपट पाहत आले आहेत. कोल्हापूर मध्ये १९२० नंतर मूकपट आणि मग बोलपट निर्मिती सुरू झाली. काही लोक चित्रपट पाहायला कोल्हापूर मधील त्यावेळच्या 'राजाराम' आणि आजच्या 'अयोध्या' थिएटरमध्ये जात असत. आम्हाला नववी मध्ये गजानन जहागीरदार यांचा 'कलेचा प्रभाव' हा धडा मराठीच्या युवकभारती पुस्तकात होता. हा धडा कोडोली हायस्कूल मधील सर्वात ज्येष्ठ मराठी शिक्षक काईंगडे सरांनी शिकवला होता. सरांनी धडा शिकविण्यापूर्वी आम्हाला मराठी चित्रपट इतिहास सांगून यातील आशय स्पष्ट केला होता. यात मूकपट, बोलपट, प्रभात कंपनी यांची माहिती त्यांच्याकडून मिळाली होती.

   कोडोलीत टुरिंग टाँकिज सुरु झाली तो काळ साठच्या दशकातील आहे. १९५० मध्ये एस.टी बससेवा सुरू झाली आणि कोल्हापूर शहरात जाण्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली. त्याअगोदर एक-दोन हाफकिन खाजगी ट्रक वजा बस होती. गरजेपुरता प्रवास लोक करीत. रसिक हे या बसने जावून कोल्हापूर शहरात सिनेमा आस्वाद घेत. १९५९ मध्ये वारणा सहकारी साखर साखर कारखाना सुरु होऊन नवी काँलनीत उभी राहत गेली. कारखान्यात प्रारंभी बाहेरचे लोक होते.त्यांनाही करमणूक साधन नव्हते. लोकांत चित्रपट आकर्षक वाढत जाण्याचा तो काळ. १९६० नंतर दिगंबर कोडगुले यांनी एस.टी.स्टँन्ड जवळ 'मनिषा' ही पहिली टुरिंग टाँकिज सुरू केली.हे कोडगुले एका चित्रपट निर्मितीचा प्रयोग करीत होते. 'पटलं तर व्हयं म्हणा' हा चित्रपट त्यांनी करायला घेतला होता. याचे बरचसे बाह्यचित्रीकरण कोडोलीत झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयात गेला. कोल्हापूर मधील दत्ता बाळ यांनी देवाची बदनामी होते, अशी भूमिका घेऊन न्यायालयात निर्माते आणि दिग्दर्शक यांना खेचले होते. बरेच वर्षे ही केस चालली आणि मग काही काटझाट करून तो प्रदर्शित झाला.यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले,अशा या कोडगुलेंनी पहिली पंधरा-वीस वर्षे गावात एकच टाँकिज चालविले. त्यांचा उदय नावाचा धाकटा मुलगा हा आमचा कोडोली हायस्कूल मधील मित्र होता. त्यांच्याकडून हे बरचसे समजले होते. 'मनिषा' हे थिएटर काही दिवस एच.के.पाटील यांनी चालविले होते. यातून अनुभव घेऊन त्यांनी गावातून बाहेर पडण्याच्या मार्गावर 'राजेंद्र' नावाचे दुसरे टाँकिज सुरु केले. पुढील तीन वर्षात आणि ऐंशी पूर्वी एम.आर. पाटील यांनी 'शिवानी' टाँकिज सुरू करताना,नवे मशीन आणि अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवून तांत्रिक दर्जा वाढवून टाकला. चौथे टाँकिज हे १९८५ मध्ये प्रकाश केकरे यांनी 'कस्तुरी' नावाने सुरू केले. नंतर एक व्हिडिओ सिनेमा थिएटर सुरू झाले. काळाच्या ओघात हे चारही तंबू बंद पडले आणि 'मनिषा'ची जागा बांधीव 'वसंत चित्रमंदिर'ने घेतली.

    आपल्याकडे शुक्रवारी नवे चित्रपट लागण्याची पध्दत आहे. नवे चित्रपट हे शहरात प्रथम येत आणि इतरत्र ते नंतर दाखविले जात. कोल्हापूरहून त्यावेळी 'पुढारी', 'सत्यवादी',' समाज' आणि 'नवसंदेश' ही वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत. यात एकपान चित्रपटांची जाहिरात राहत असे. बहुतेक तरुणवर्ग हे पान आवर्जून पाहत असे. त्यांच्यात कोणता चित्रपट चांगला किंवा वाईट,अशी चर्चा होत असे. नवा चित्रपट हा वर्षभरात कोडोलीत असे. कोडोलीचा बाजार हा गुरुवारी असल्याने, चित्रपट हा याच दिवशी लागायचा. प्रेक्षक संख्या आणि आवड विचारात घेऊन मालक आठदिवस एक फिल्म रात्री चालवत. बुधवारी सकाळी जुने रंगवलेले फलक हे चुना लावून स्वच्छ केलेले असत. यात नव्या चित्रपटाची चाहूल दिसायची. नवा चित्रपट लागण्या अगोदर मोठा फलक पोस्टर्सनी सजलेला असे. त्याची जागा टाँकिज बाहेर प्रवेशद्वारावर असे. लहान आकारातील पोस्टर्सही गावात एक-दोन मोक्यांच्या ठिकाणी राहत. सायंकाळी हलगी वाजवत लहान पोस्टर्स गावातील प्रमुख आणि गल्ल्यातून ते फिरविले जाई. गावातील मातंग समाजातील हलगीवादक दोन मुले बरोबर घेऊन पार पाडत. गाव मोठे असल्याने, फेरी पूर्ण होण्या अगोदरच हलगी उतरून जायची. वादक एखाद्या कोपऱ्याचा आश्रय घेऊन कागद-चघळा पेटवून हलगी पुन्हा शेकून तयार करत आणि उर्वरित फेरी पूर्ण होई. लहानमुले ही छोटी मिरवणूक आणि जाहिरात कुतूहलाने पाहत. आठदिवस जाहिरात अशाच पध्दतीने केली जात असे. याचा परिणाम रात्री गर्दीत दिसून यायचा.

    कोडोली मधील सर्वात जुन्या 'मनिषा' मध्ये सुरवातीला मध्यम स्वरूपाचे चित्रपट दाखविले जात. सत्तरच्या दशकात काही मराठी, हिंदी चित्रपटांनी मात्र टाँकिज घरोघरी पोहचली. व्ही.शांताराम यांचा 'पिंजरा' हा १९७२ मध्ये प्रदर्शित झाल्यावर काही दिवसात 'मनिषा' मध्ये लागला होता. डिसेंबर थंडीत पंधरा दिवस हा चित्रपट कोडोलीत चालला. मी माझ्या आई आणि काही शेजारी यांच्या बरोबर हा चित्रपट पाहिला होता. चित्रपटाचे कथानक, गाणी, संगीत, प्रभावी होते. लावण्याची भुरळ फारच मोठी होती. 'पिंजरा'चे काही बाह्य चित्रीकरण हे बोरपाडळे हाँटेल परिसरात झालेले होते, त्याची चर्चा प्रेक्षकांत असे. या थिएटरमध्ये संस्मरणीय नोंद ही दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' चित्रपटाची झाली. कोडोलीत १९७५ मधील डिसेंबर महिन्यात 'प्रभात' सर्कस आली होती. सर्कशीचे सायंकाळी आणि रात्री असे दोन खेळ होत. याच दरम्यान 'मनिषा' मध्ये 'पांडू हवालदार' लागला. सर्कस पाहून प्रेक्षक चित्रपट पाहायला येत किंवा चित्रपट पाहून सर्कस पाहायला जात. आसपासच्या खेड्यांतून लोक बैलगाडी, सायकली घेऊन पाहायला यायचे. वाढती गर्दी विचारात घेऊन सर्कस आणि चित्रपट तीन खेळात चालविले गेले. सर्कस आणि चित्रपट यांचा आनंद घेऊन लोक पहाटे घरी पोहचत. सर्कशीचा सुध्दा मोठा तंबू होता. खेळ संपला की, बाहेर मोठ्या टाँर्च मधून प्रखर प्रकाश आकाशात टाकला जायचा. हा प्रकाश पाच कि.मी. परिसरात दिसायचा. प्रकाश मोठा नयनरम्य वाटायचा. या यशानंतर नवे चित्रपट आणण्यावर भर दिला गेला. याच दरम्यान प्रदर्शित झालेला 'शोले' पंधरा दिवसांहून अधिक काळ कोडोलीत तंबूत टिकून राहिला होता. यासाठी 70 एम एम.च्या मापाने पडदा लावला गेला होता. १९७६ मध्ये एच.के.पाटील यांचे 'राजेंद्र' थिएटर सुरु झाले. यात आम्ही 'दिवार' पाहिला होता. अमिताभ बच्चन यांचे ऐंशीच्या दशकातील बहुतेक चित्रपट याच थिएटरमध्ये लागले होते. मराठीतील निळू फुले, ललिता पवार, रंजना यांचा 'सासुरवाशीन' हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. डॉ. जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' पुढील वर्षांत येथेच लागला होता. मी पहिल्यादिवशी चित्रपट पाहण्यासाठी गेलो. गर्दी तुरळक होती म्हणून मालकांनी दुसऱ्या दिवशी हिंदी चित्रपट लावला. 'शिवानी' नावाचे तिसरे थिएटरमध्ये गावात तळी नावाच्या भागात एम.आर.पाटील यांनी सुरु केले. यासाठी नवा कोरा तंबू,प्रोजेक्टर मशीन आणि साऊंड सिस्टीम आणली. 'हम किसेसे कम नही' या चित्रपटाला घेऊन हे थिएटर दणक्यात सुरू केले गेले. लोक पडदा, साऊंड सिस्टीम यासाठी हे थिएटर विसरणार नाहीत. शरद पिळगांवकर यांचा 'अष्टविनायक' चित्रपट बऱ्यापैकी येथे चालला. 'सर्वसाक्षी' हा सामाजिक चित्रपट आम्हाला येथे पाहता आला. जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा यांचे सिनेमे येथेच जोरदार चालले. १९८५ मध्ये प्रकाश केकरे यांनी 'कस्तुरी' थिएटर सुरू केले होते. येथे सलमान खान, अमीरखान,जुही चावला यांचे काही चित्रपट लावले गेले. व्यावसायिक पातळीवर हे थिएटर लवकर बंद पडले.
    बहुधा सर्वच थिएटरमध्ये रात्री शो राहत. एखादे वेळी शाळेच्या गँदरिंगचा चित्रपट आणि डिमांड शो वगळता ही वेळ सर्वांना सोयीची होती. पोस्टरवर रात्रौ ९.३० अशी वेळ दाखविली असली,तरी सव्वा दहा ते उशिरा साडे दहा वाजता सुरू करून तो रात्री दिड पर्यंत संपून जाई. तंबूतील चित्रपट पावसाळ्यात नसत. साधारणपणे दिवाळीपासून ते जूनच्या पहिल्या पावसापर्यंत पाच एक महिने रोज रात्री शो व्हायचे.चित्रपटाची वेळ ठरवताना तरुण मुले, मुली,काँलेज विद्यार्थी,महिला, शेतमजूर यांचा विचार असे. कोडोली शेजारील जाखले, पोखले, बहिरेवाडी, नवे पारगाव, शहापूर अशा गावांतून लोक येत. यात काही सायकल चालवत आणि चालतही येणारेही होते. महिला घरातील रात्रीची जेवणे आटोपून आणि भांडीकुंडी साफ करून येत. शेतमजूर हे सायंकाळी दुसऱ्याच्या शेतातून काम करून आणि येताना घरच्या जनावरांनसाठी वैरण घेऊन येत. हा वर्ग या तंबू चित्रपटांचा मोठा चाहता होता. तिकीटदर हे नंतर दोन रुपये झाले होते आणि ते सर्वांना परवडणारे होते.आम्ही अनेक मित्र रात्री वारणानगरहून जावून हे चित्रपट पाहत असू. परीक्षा झाली की, चित्रपट पाहायचा हा शिरस्ता होता. एरवी सुद्धा चांगला चित्रपट लागला की जाणे व्हायचे. परंतु वडिलांची परवानगी ही प्रयत्नपूर्वक मिळवावी लागत असे. आमच्या मागे राहणारे जे.बी.नाईक हे उत्साही असत. ते मध्यस्थी करत. नाईक अण्णांच्या पुढाकारातून अनेक चित्रपट पाहता आले. सोबत त्यांची तिन्ही मुले दिपक, प्रकाश, बाळू हे राहायचे. आमची मैत्री यातून अधिक बांधली गेली.
थिएटरमध्ये बैठक व्यवस्था भारतीय होती. मध्ये दोरी लावून पुरुष आणि महिला अशा दोन व्यवस्था होत्या. भारतीय बैठकीसाठी लोक घरातून पोती, कांबळी किंवा किलताण आणत. जे काही घेऊन येत नसत, ते सरळ पायाखाली चप्पल घेऊन बसत. चित्रपट सुरु होण्या अगोदर लाँऊडस्पिकरवर पुंगी मोठ्याने वाजत राही.यामुळे लोकांना चित्रपट आहे, असा निरोप दिला जाई. पावणे दहानंतर पुंगी फक्त तंबूत वाजत राही. दहानंतर आवाज कमी करून चित्रपट सुरु होण्याचा संकेत दिला जाई. प्रारंभी व्यावसायिक जाहिराती फिल्म आणि नंतर फिल्म डिव्हिजन फिल्म दाखवून मग मूळ चित्रपट सुरू केला जाई. प्रथम दोन मोठी रिळे संपवून मध्यंतर दहा-पंधरा मिनिटांचा राही. यात लोक थोडे बाहेर जावून चणेफुटाणे खाऊन येत. चित्रपट सुरु असताना फिल्म तुटून रसभंग व्हायचा. प्रोजेक्टर रुम बाहेर साठचा साधा बल्ब लागे. त्याचा प्रकाश पुरेसा नाही म्हणून काही हौशी पडद्यावर बँटरीटाँर्च टाकत. काही शिव्या देत. दहा मिनिटात पुन्हा चित्रपट सुरू करून तो ग्रिप घेई. सत्तर-ऐंशीच्या दशकात चित्रपटात आदर्शवाद होता. हिरोचे कष्ट आणि हिराँईनचा छळ यावर चित्रपट बघताना लोक प्रतिक्रिया देत. चित्रपटाच्या शेवटी मारामारी, हिरोची फायटिंग याला लोक समररस होत, मार,बडव अशा सूचना करत. शेवटी हिरो सर्व गुंडाना लोळवतो आणि पोलीस पकडण्यासाठी येत. 'समाप्त' अशी अक्षरे दिसताच लोक बाहेर येऊन घरी जायला निघत. ही वेळ साधारणपणे दीडची असे. बाहेर पडताना एकच मार्ग असे आणि अंतर ठेवून पुरुष व महिला बाहेर पडत. यात एकदा प्रेमिक तरूण गुलाबी किंवा पिवळ्या अर्ध्या तिकिटावर प्रेमसंदेश लिहून एका छोट्या दगडात गुंडाळून, तो अपेक्षित मुलीकडे टाकून पुढे निघून जायचा.यात काहींना पुढे यशही मिळून गेले. एकच गावात तीन थिएटर असल्याने, रात्री अडीच पर्यंत रस्त्यावर वर्दळ राही. याच काळात साखर कारखाना सुरु असे. रात्री बैलगाड्या, ट्रक आणि ट्ँक्टर मधून ऊस वाहातूक सुरु असे. एखादा ग्रुप रात्री ऊस खात घरी पोहचत असे. चित्रपट पाहून प्रभावी मुले शाळेत आपल्या चित्रपट न पाहिलेल्या मित्रास सारांश स्वरूपात कथा सांगत,यात एक वेगळी मजा होती.

    चित्रपट हा समाजाचा आरसा किंवा जे समाजात ते चित्रपटात, अशी सुभाषित वाक्ये शाळा-काँलेजात सतत कानावर पडत असत. कोडोली गाव आणि वारणा परिसरात हे तंतोतंत लागू झाले होते, हे मलाही शालेय जीवनात पाहायला मिळाले. वारणा विद्यामंदीर मध्ये शिकत असताना केशभूषेत 'कोंबडा' फँशन होती. राजेश खन्नाची वेषभूषा, केशभूषा, स्टाईल ही तरुणामध्ये दिसत होती. राजेश खन्ना नंतर अमिताभ बच्चन यांचा काळ आला. 'दिवार','शोले' ने पूर्ण परिमाण बदलून टाकले. बिटल्स, बेलबाँटम पँन्ट नव्या फँशन पुढे आल्या. आमच्या कोडोली परिसरात हा बदल वेगाने आला. महागड्या टेरिलिन,टेरिकाँट कपड्याला एस कुमार शुटिंग- शर्टिंगचा मध्यम पर्याय उपलब्ध झाला. तरूण आणि विशेषतः नव्याने काँलेजला जाणारी मुले ही नव्या रूपात वावरु लागली. केशभूषा ही बिटल्स वळणावर गेल्याने, अनेकजण खिशात छोटा कंगवा ठेवू लागले. याच काळात काही शाळा-काँलेजात एन.सी.सी.असे. यात सहभागी मुलांना बिटल्स कट ठेवण्याची मुभा नव्हती. नव्या फँशन मधून नवी टेलरिंग व्यवस्था आली. तो काळ कपडे विकत घेऊन शिवण्याचा होता. त्यामुळे टेलरिंग व्यवसाय वधारून गेला. हाच बदल केशकर्तनालयात दिसून येऊ लागला. नव्या फँशेनमुळे या दुकानाचा चेहरा बदलून गेला. तरूण दुकानात यावेत म्हणून आकर्षक फर्निचर मांडले गेले. रेडिओ, टेपरेकॉर्डर यातून गाणी ऐकवणे, क्रिकेट समालोचन सुरु ठेवणे, हे नवे बदल दुकानात आले. याचा फायदा अर्थात कारागिरांना होत गेला. दिवसाकाठी काही काम असो नसो,तरूण ओळखीच्या दुकानात जावून आरशासमोर उभे राहत. फँशन बदलाचा एवढा फायदा तरुण मुली घेऊन शकत नसत. घरातील सौंदर्य प्रसाधन वापरून वाटचाल पुढे जात राहिली. हा काळ ब्युटीपार्लर सुरू होण्यापूर्वीचा आहे. साधीराहणी आणि नाकासमोर चालणे ही आदर्शवादी कल्पना समस्त स्त्री वर्गावर प्रभाव ठेवून होती.घरचे कार्यक्रम, शाळा-काँलेजातील स्नेहसंमेलनात फारतर रंगीत कपडे आणि उपलब्ध सौंदर्य प्रसाधने वापरण्याची संधी तरुण मुलींना मिळत राहिली. नव्वदच्या दशकात खूप मोकळेपणा मुलींना अनुभवता आला. आज केवळ चित्रपटच नाही तर समाजमाध्यमे, वेब यांनी फँँशन आणि सौंदर्य यांची व्याख्या बदलून टाकली आहे. परंतु हे सिंहावलोकन करताना चित्रपटांचे फँशन योगदान अधोरेखित करून ठेवावे लागते.

    'तंबूंतील भावविश्व' हा विषय साठ ते ऐंशीच्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा भावनिक आठवणींचा मोठा ठेवा आहे. हा कालावधी खूपच मोठा आहे. यातील प्रत्येकाचे अनुभव वेगळेही असतील. परंतु समानता ही की, सर्वांचे भावविश्व खुलवले गेले. गेल्या चाळीस वर्षात भावविश्व खुलविणारी तंबू थिएटर व्यवस्था आता इतिहासात जमा आहे. घरोघरी केबल,टि.व्ही, डिश यांनी करमणूक, फँशन यांचे परिमाण बदलून टाकले. आता होम थिएटरचा जमाना येऊन एक दशक ओलांडले आहे. तंबू ते होम थिएटर हा प्रवास मनोरंजक, उत्साही असाच आहे. या कालखंडाचा सहप्रवासी होताना असंख्य आठवणी बरोबर आहेत. त्यांना शब्दबध्द करणे आवश्यक होते.मी हा एक प्रयत्न करून पाहिला आहे.
डॉ. संजय रत्नपारखी







सोमवार, २० एप्रिल, २०२०

सांस्कृतिक संचित


    वारणा सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९५९ मध्ये झाल्यानंतर अवघ्या दहा एक वर्षात वारणानगर वसाहत आणि तेथील विविध उपक्रम समाजासमोर यायला सुरुवात झाली. कारखान्याचे चेअरमन तात्यासाहेब कोरे आणि कार्यकारी संचालक नंदकुमार नाईक यांचे वारणा उपक्रम वाढविण्यासाठी मोठे योगदान होते. वारणानगर हे साठच्या दशकानंतर आकाराला येताना आर्थिक, सामाजिक बदल घडून आले. सांस्कृतिक बदलांनी या वसाहतीस आणि आसपासच्या गावांना अभिरुची संपन्न करण्यास मदतच केली.

    वारणानगच्या सांस्कृतिक जीवनात दरवर्षी काही टप्पे ठरलेले असायाचे. वारणा साखर कारखान्याचा गणेशोत्सव खूप मोठा राहायचा. गावात मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिर होते. दरवर्षी हनुमान जयंती ही धार्मिक पध्दतीने साजरी करताना एकदा नामांकित शास्त्रीय गायक मंदिरात रागदारी करुन जायचा. यानिमित्ताने मोठ्या गायकाची गायकी फार जवळून पाहता आली. याचबरोबर दरवर्षी १ आँगष्ट ते ७ आँगष्ट या काळात 'वर्षा व्याखानमाला' व्हायची. यात नामवंत वक्ते, अभ्यासक यांची व्याख्याने आयोजित केली गेली. यासर्व गोष्टी आकाराला येताना कार्यक्रम आयोजनासाठी दोन जागा कायमस्वरूपी निश्चित झाल्या. एक म्हणजे लालबहादूर शास्त्रीभवन आणि दुसरे म्हणजे दवाखान्यासमोरील मोकळे मैदान.

   वारणा साखर कारखाना गणेशोत्सव हा प्रथम शुगरहौस मध्ये धार्मिक कार्यक्रम ,तर शेजारील मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. शुगरहौस मध्ये एकदा मोठा देखावा, श्रीची आकर्षक मूर्ती हे एक मोठे आकर्षण राहायचे. सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक नाटके व्हायची. मुंबईहून व्यावसायिक कंपन्याची नाटके ही मोठी मेजवानी राहायची. किमान दोन संगीत नाटके यात पाहायला मिळायची. याचबरोबर स्थानिक कलाकारही दरवर्षी दोन नाटके प्रयत्नपूर्वक सादर करीत. नाट्यसंपदाची बहुतेक सर्व नाटके मोकळ्या मैदानात सादर झाली. नाटके पाहायला गर्दी मोठी व्हायची.त्यात पाऊस ही हजेरी लावायचा. कार्यक्रमाचा हिरमोड होऊ नये, म्हणून ताडपत्री टाकून मांडव घातला गेला. याच अशा मांडवात 'तो मी नव्हेच' चे दोन प्रयोग झाले,यातील एक प्रयोग महिला आणि मुले तर दुसरा प्रयोग हा पुरुषांच्यासाठी सादर झाला होता. यात एक लोकनाट्य व्हायचे. हे पाहण्यासाठी आसपासच्या गावांतून मोठ्या संख्येने लोक यायचे. वाढती गर्दी आणि काँलनीतील सुरक्षितता विचारात घेऊन जागा बदलली गेली. दवाखान्यासमोरील मैदान हे याचे मानकरी ठरले. १९७६ पासून गणेशोत्सव कार्यक्रम याच मैदानावर झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्र पाच दिवसांची व्याख्यानमालेची सुरुवात याच मैदानात झाली होती. गणेशोत्सवात कुस्त्यांची दंगल याच मैदानावर झाली आहे. अधूनमधून सत्कार समारंभ, विविध खेळ, जाहीर सभा, अधिवेशने याचे साक्षीदार असलेले हे मैदान आता पन्नाशी पूर्ण करेल. मी वारणा विद्यामंदीर मध्ये शिकत असताना हे मैदान फारसे वापरात येत नव्हते. शाळेची मुले, शिक्षक यांची ये जा याच मैदानातून व्हायची. गणेशोत्सव कार्यक्रम येथे स्थलांतरित झाला आणि मैदानाचे महत्त्व वाढत गेले.

   वारणानगर आकाराला येत असताना मध्यम कार्यक्रम आणि सादरीकरणासाठी बंदिस्त हाँल नव्हता. ही गरज विचारात घेऊन वारणा विद्यामंदिर जवळील एका प्रशस्त जागेत आणि मुख्य रस्त्यावर लालबहादूर शास्त्रीभवन हे उभारले गेले. तत्कालिन महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते दि. २०-१०-१९७० रोजी याचे उदघाटन झाले. यावर्षी शास्त्रीभवनचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हा हाँल उभा राहण्यापूर्वी मोकळी जागा होती. या जागेवर कारखाना शेतीतील मळणीची कामे काही काळ चालायची. शेजारी एस.टी.स्टँड असल्याने त्यावेळच्या हिशोबाने वहातूक दिसायची. पश्चिमेला कोडोली आणि पूर्वेकडे वडगांव आणि कोल्हापूरला जाणाऱ्या एस.टी.बसेस, ट्रक यांची ये जा होती. शास्रीभवन झाले आणि या जागेचे रूपच पालटून गेले. समोरच्या मोकळ्या जागेत हिरवळ लावून सुशोभीकरण केले होते.यावर सायंकाळी किंवा सुट्टी दिवशी मुले खेळ खेळत. कालांतराने इमारतीच्या उत्तर बाजूस बरीच रिकामी जागा होती, तेथे झोपाळे,घसरगुंडी उभी करून लहान मुलांना बागडण्यासाठी पार्क उभा केलेला होता.त्यामुळे लहान मुले आणि पालक यांची वर्दळ तेथे दिसायची. छ.शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक समरंभास जून १९७४ मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम झाले. हे औचित्य साधून याच वास्तू परिसरात रायगड किल्ल्याची भव्यदिव्य प्रतिमा उभा केली होती.

   शास्त्रीभवन हा बहुउद्देशीय हाँल असल्याने, शाळेतील परीक्षेपासून लग्नकार्य, सिनेमे, नाटके, गँदरिंग, व्याख्यानमाला, वाचनालय, संस्थाच्या वार्षिक सभा, सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रयासाठी वापरला जात असे. शेजारी वारणा विद्यामंदिर ही प्राथमिक शाळा होती. यातील लहान गट मागील बाजूस भरवले जात. माझ्या काही वार्षिक परीक्षा याच इमारतीच्या मुख्य हाँल मध्ये झाल्या. वारणानगर मध्ये सिनेमा थिएटर नव्हते. वारणा कामगार सोसायटीने याच इमारतीत एक प्रोजेक्टर बसवून काही वर्षे सिनेमे दाखविले. बहुधा जुने हिंदी आणि मराठी सिनेमे असत. ते फक्त बुधवार, गुरुवारी असे दोनच दिवस पाहायला मिळायचे. त्यावेळी रिळाची पेटी एस.टी.ने वारणेत येई. सोसायटीचा हमाल ती हातगाडीवर घेऊन जाताना दिसला की, काँलनीत खेळ खेळणाऱ्या मुलांचे चेहरे उजळून सिनेमा कोणता आहे, याबद्दल त्यांची उत्सुकता ताणली जायची. बुधवार किंवा गुरुवारी दुपारी मुख्य चौकात चित्रपटाचा फलक आणि मध्यम पोस्टर झळकलेले दिसे. आम्ही मुलांनी येथे अनेक चित्रपट पाहिले. भालजी पेंढारकर यांचा छ.शिवाजी महाराजांवरील ' मराठा तितुका मेळवावा' हा चित्रपट तर सलग पंधरा चालवून आसपासच्या परिसरातील शाळांना हा दाखविला होता.राजेश खन्नाचा 'हाथी मेरे साथी' आणि मेहमूदचा ' बाँम्बे टू गोवा' हे चित्रपट येथे पाहिल्याचे स्मरणात आहे. शास्त्रीभवन मध्ये बँडमिटन कोर्ट होते.यात काही लोक सायंकाळी बँडमिटन खेळत. याशिवाय प्रवेशद्वार शेजारी शारदा वाचनालय होते. सभासद फी दरमहा पाच रूपये घेऊन ते सुरू झाले. रोजची मराठी दैनिके, साप्ताहिके, कादंबऱ्या, कथासंग्रह अशी पुस्तके वाचकांना मिळत. मी रोज सायंकाळी मुंबईची वर्तमानपत्रे येथे वाचत असे.

उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे आँगष्ट ७७ पासून शारदा वाचनालय आणि वारणा साखर कारखाना यांनी वर्षा व्याखानमाला सुरू केली, जी आजही सुरु आहे. या व्याखानमालेच्या निमित्ताने खूप मोठे वक्ते, अभ्यासक, ऐकायला मिळाले. प्राचार्य शिवाजीराव भोसले, अनिल अवचट, डॉ.नरेंद्र दाभोलकर, द.मा.मिरासदार, डॉ.निर्मलकुमार फडकुले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, राम कापसे, आचार्य शांताराम गरुड, यशवंतराव मोहिते, डॉ. अंबादास माडगूळकर अशी सहज नावे आठवतात. या व्याख्यानमालेत प्रास्ताविक आणि परिचय करून देण्यासाठी प्राचार्य सत्यशील पोंदे, प्रा.सुरेश शिरोडकर, डॉ. मुकुंद दातार हे उत्तम भूमिका निभावत असत.

   शास्त्रीभवन वापरात तशी लवचिकता होती. याच जागेत जागतिक किर्तीचे रघुवीर जादूगार यांचा प्रयोग पाहता आला. शरद तळवलकर यांच्या 'सखी शेजारीन' नाटकाचा आणि काळूबाळू यांच्या लोकनाट्याचा व्यावसायिक प्रयोग तिकीट लावून हाऊसफुल्ल झाले होते. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारणानगरला बाहेरची सतत येत त्यांचे स्वागत समारंभ येथेच झाले. यशवंतराव चव्हाण यांचे अखरेचे भाषण याच हाँल मध्ये १९८१ मध्ये झाले होते. सत्ता हातात नसली की, लोकही किती लांब जातात ,याचे यथार्थ दर्शन सत्कारात दिसले होते. वसंतरावदादा पाटील हे खासदार असताना अशाच एका लग्नासाठी शास्रीभवन मध्ये आले होते. लग्नासाठी बँन्ड पथक हे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रक गावातील होते. विशेष म्हणजे एका अंध व्यक्तीने हा बँन्ड उभा केला होता. त्याचे नाव ऐकून दादांनी लग्न समारंभ आटोपल्यावर दोन गाणी ऐकून पथकाचे अभिनंदनही केले होते.

 नोकरी निमित्ताने गाव सोडून तीन दशके पूर्ण झाली. कामा निमित्ताने महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध विभागात जात असताना विविध कला, नाटके पाहायला मिळत गेली. या कलांचा आस्वाद घेताना आपल्या सांस्कृतिक संचिताची आठवण येते. तुलना होते आणि आपण रसिक म्हणून आधीच घडत होतो,याची जाणीव होते. अशा असंख्य आठवणी जागवत काळ पुढे सरकत आहे. वारणानगर मधील किमान दोन पिढ्यांचे सांस्कृतिक संवर्धन या दोन जागांनी केले आहे. मी आणि माझे सर्वसमकालीन मित्र मात्र हा वारसा सांभाळून आहोत.
डॉ. संजय रत्नपारखी