रविवार, ५ एप्रिल, २०२०

आमचे क्रिकेट

  वारणानगर हे कोडोली गावचे उपनगर. साखर कारखाना झाला आणि ते जन्माला आले. आता या गोष्टीला सत्तर वर्षे होत आली. वसाहतीत व्यवस्थित रचना. कायम स्वरुपी कर्मचारी हे सिमेंट चाळीत राहत. सिझनल कर्मचारी हे बेंगलोरी चाळीत वास्तव्य करीत. याशिवाय कारागीर, पूरक कर्मचारी यांच्यासाठी एक व्यवस्था होती. याचाळीत दोन पिढ्यां माझ्यासमोर मोठ्या झाल्या. काँलनीत सर्व सुविधा होत्या. भरपूर दुतर्फा झाडे, स्वच्छता यामुळे अल्पावधीत वारणानगर हे प्रसिद्धीला येत गेले. अनेक कलाकार, लेखक हे सतत वारणानगर पाहायला येत. काही मराठी चित्रपटांचे बाह्य चित्रीकरण वारणेत झाले. 'सामना, अनोळखी, प्रीत तुझी माझी, भाग्याचं कुंकू' हे चित्रपट लक्षात आहेत. एकदा पु.ल आणि सुनिताबाई हे वारणानगरला आले. सर्व पाहून ते फारच खूष होते. आपण अमेरिकेतील खेड्यात फिरत आहोत,असा भास झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते.

वारणानगरमध्ये मुले बहुधा सिझनल खेळ खेळत. काँलनीत मुले कधी विटीदांडू, तर कधी आटापाट्यात आनंद मानत. मुली या बहुधा त्यांचे पारंपरिक खेळ खेळताना दिसत. घरांची रचना समांतर असल्याने मधली जागा हेच मैदान होई. यात पारंपरिक आणि क्रिकेट, फुटबॉल खेळला जाई. पारंपरिक खेळात खर्च नव्हता. अंगमेहनत आणि खेळण्यासाठीची इच्छा हे निकष होते. क्रिकेट आणि फुटबॉलसाठी साहित्य लागे. मोठ्या आकारातील चेंडू हे फुटबॉलसाठी भूमिका निभावत. क्रिकेटसाठी गल्लीत तरी साध्या फळीची बँट ,रबरी चेंडू आणि स्टप म्हणून लोखंडी सळ्या वापरून सराव व्हायचा. यात एक गंमत असायची. बँट आणि चेंडू घेऊन येणाऱ्यांना मोठा मान होता. त्यावेळी कसोटी सामने व्हायचे. क्रिकेटपटू हे कंपनीची बँट आणि लेदरबाँल वापरतात ही चर्चा व्हायची. असे साहित्य बघायला मिळणे मुश्किल होते. वारणा महाविद्यालयात त्यावेळी काही काळ डॉ. रा.धों.शिंगटे प्राचार्य होते. ते कडक पण स्वतः क्रिकेट आणि बँडमिटन खेळणारे होते. सरांच्या पुढाकारातून क्रिकेट साहित्य खरेदी होऊन मुले सराव करू लागली होती. यामुळे कंपनीची बँट, लेदरबाँल, मँट, पँड हे लांबून पाहण्यासाठी संधी मिळाली होती.

आमच्या काँलनीत हिवाळ्यात क्रिकेट अधिक खेळले जाई. शाळा सुटल्यावर किंवा सुट्टी दिवशीच चांगला सराव मिळायचा. यात सिनियर हेच बहुधा बँटिंग आणि बाँलिंग करत. लहानमुले क्षेत्ररक्षक म्हणून काम करत. माझ्या समयस्क मुलांना ही संधी कमी मिळायची. आम्ही यावर उपाय म्हणून आमचा पाच-सहा मुलांचा समूह करून सराव करत असू. माझ्याकडे अधूनमधून रबरी चेंडू आणि टेनिसबाँल राही. त्याचा वापर होई. कंपनीची बँट शक्य नव्हती म्हणून शेवटी वडिलांना सांगून एका वखारीतून पेरूच्या लाकडाची बँट करून घेतली .मी, अविनाश शिंदे, राजेंद्र काळे, यावर खूप खेळलो. आमच्या शेजारच्या गल्लीत राहणाऱ्या सलीम आणि रशीद मुलाणी या भावंडानी कंपनीचे क्रिकेट साहित्य विकत घेऊन सराव सुरु केला होता. ते आम्हाला कधीतरी सहभागी करून घेत. यातूनच आमचे संघ आकाराला येत गेले. आम्ही तिसरी-चौथीत गेल्यानंतर सामन्यात लिंबूटिंबू म्हणून सहभागी करून घ्यायला सुरुवात झाली. मैदानावर साहित्य घेऊन जाणे, स्कोअर लिहिणे ही कामे वाट्याला येत. वारणा विद्यामंदीर शाळे समोर किंवा दवाखान्या समोरील मैदानावर सामने खेळले जात. यात काही सामने चुरशीने झाल्याचे लक्षात आहे. आमच्या गल्लीत राहणाऱ्या दत्ता पाटीलने शाळेच्या मैदानावर शतक ठोकून पहिला शतकवीर मान पटकावला होता. याशिवाय आम्हाला बरेच सिनीयर असलेले चंद्रकांत माने आणि मिलिंद दुर्वे हे उत्तम क्रिकेट खेळत.

शाळेत काँलरा प्रतिबंध लस ही नेहमीच टोचली जायची. डिसेंबर महिन्यात असाच एक लसीचा ढोस अख्ख्या शाळेत दिला गेला. हे इंजेक्शन खूपच दुखायचे म्हणून सुट्टी मिळाली. रात्री हात सुजला आणि त्याला शेख दिला गेला. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने गल्लीत मँच सुरु झाली. यात कधी नव्हे ती बँटिंगची मला संधी मिळाली. माझ्या घरगुती बँटवर आणि सुजलेला दंड घेऊन चांगल्या धावा केल्या. आमचे सिनियरही खूष झाले. त्यांनी या सामन्यानंतर थेट माझा आणि राजेंद्र काळेचा,त्यांच्या संघात समावेश करून टाकला. संघात प्रवेश मिळाल्याने सरावात संधी मिळत गेली. हळूहळू गोलंदाजी करू लागून संघात स्थान बळकट झाले.

वारणानगर मधील काँलनीच्या रचनेनुसार तीन संघ मैदानात येत राहायचे. सिमेंट चाळ ए ते एफ आणि जी ते एल यात दोन संघ आणि तिसरा संघ बेंगलोरी चाळीत तयार झाला. हे संघ आलटून पालटून मँचेस खेळत.मी आणि माझे मित्र ए ते एफ समूहात होतो. आमच्यात राम साठे,हणमंत मोरे, रशीद मुलाणी, मुकुंद गोडबोले, जगदीश कुलकर्णी, जीवन कदम,विजय दिवाणजी,अनिल मंगसुळे, युवराज भोसले ,विजय कुंभोजकर, राजेंद्र काळे, हे खेळाडू होते. संघाचे नेतृत्व हे जीवन कदम तर कधी हणमंत मोरे हा करत असे. जीवन,राम हणमंत हे उत्तम बाँलिंग करायचे. विजय कुंभोजकर हा नेहमी यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळायचा. दुसऱ्या संघाचे नेतृत्व विनोद भोसले आणि अनिल पाटील करत. तर तिसरा संघ नजेर मणेर यांचा होता. बहुधा सामने हे बुधवार, शनिवारी दुपारी अर्धवेळ सुट्टीत आणि रविवारी खेळले जात. यात मजा यायची. कधी भांडणे होत.परंतु ती नंतर ऊस खात सोडविली जात. चेंडूसाठी वर्गणी गोळा केली जाई. हे सामने रंगतदार होताना काही रक्कम बक्षीस ठेवावी, ही कल्पना निघाली. प्रत्येक संघ राखीव खेळाडू धरून प्रत्येकी एक रुपया प्रमाणे बारा रुपये गोळा करी. दोन्ही संघाची रक्कम रू २४/- ही विजयी संघाला दिली जाई. आमच्या संघाने चारवेळा सामने जिंकून विजयश्री खेचून आणली होती. दोन विजयात माझे योगदान अंतिम टप्प्यात विजय खेचण्यासाठी झाले. संघात सांघिक भावना प्रबळ होती. एका सामन्यातील विजयानंतर अख्खा संघ सायंकाळी ऊस गाडीतळासमोर रेणुका रेस्टॉरंट मध्ये मिसळ खायला गेला. त्यावेळी मिसळ ही चाळीस पैसे आणि चहा वीस पैशात मिळायचा. मिसळ खाऊन राहिलेली रक्कम ही चेंडूवर खर्ची घातली गेली. आमचे क्रिकेट प्रेम वाढत असताना,मी स्वतः जून मध्ये कोडोली हायस्कूल मध्ये गेलो. शाळेच्या वेळा बदलत गेल्या. खेळातील रस हा अभ्यासाकडे झुकला. मी मात्र मग क्रिकेट आणि खेळ यापासून लांब जात राहिलो. मागील चाळीस वर्षातील काही मित्र भेटले की आठवणींना उजाळा मिळतो. आमचे काही मित्र आम्हाला कायमचे सोडून गेले. याच मित्रांची आठवण जागवत, हा संस्मरणीय लेख पूर्ण करता आला.

डॉ. संजय रत्नपारखी






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा