कोडोली हे गाव म्हणजे
पन्हाळा तालुक्याचा पूर्व भाग. गावापासून दहा किलोमीटरवर वारणानदी आणि सांगली
जिल्ह्याची हद्द. पूर्वेकडे हातकणंगले आणि पश्चिमेला रत्नागिरीकडे जाण्याचा मार्ग.
शेती हा येथील मुख्य व्यवसाय. सुपीक आणि बागायती शेतीमुळे सधनतेचा वारसा लाभलेले.
स्वातंत्र्यपूर्व काळात हा कोल्हापूर संस्थानचा भाग होता. या संस्थानात जी सधन
गावे होती, त्यात
कोडोली एक होते. संस्थान काळात कोडोलीत नगरपालिका होती. गुरुवारी आठवडी बाजार भरत
असल्याने, व्यापारी
उलाढाल येथे सातत्याने सुरु आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मिशनऱ्यांनी या गावात
शाळा आणि दवाखाना सुरु केला होता, त्यामुळे आसपास गावातील
लोक, विद्यार्थी
यांची ये-जा राहिली. कोडोली शिक्षण मंडळाने १९४६ साली माध्यमिक स्तरावरील पहिली
शाळा कोडोली हायस्कूल या नावाने सुरू केली. यंदा हे हायस्कूल आपले ७५ वे स्थापना
वर्ष साजरे करीत आहे. कोडोलीच्या पूर्वेस दोन कि.मीटरवर, तात्यासाहेब कोरे यांनी
१९५९ मध्ये वारणा सहकारी साखर कारखाना सुरु करून विकासपर्व सुरू केले. यातूनच आजचे
वारणानगर आणि येथील उपक्रम सुरू झाले. साठच्या दशकापासून वारणा-कोडोली परिसर
महाराष्ट्र आणि देशात चर्चेत आला. आजही वारणानगर हे कोडोली ग्रामपंचायत हद्दीत
येते. येथील लोकसंख्या सत्तर हजारच्या आसपास गेली आहे. महाराष्ट्रात ज्या मोठ्या
ग्रामपंचायती आहेत, त्यात
कोडोली एक आहे.
जुन्या
काळापासून रसिक गाव अशी एक वेगळी ओळख सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात मेळे, तमाशे येथे येत
असत. शाहीर पठ्ठेबापूराव कुलकर्णी आणि पवळा यांचा तमाशा फड काही दिवस येथे
मुक्कामाला होता. पठ्ठेबापूरावाची लावणी आणि पवळाचे सादरीकरण यात रात्री सुरू
झालेला कार्यक्रम पहाटे संपे, अशी माहिती काही जुन्या लोकांकडून ऐकायला मिळालेली आहे. कोडोली
गावात सिनेमा हा तंबूत सुरु झाला,तो काळ साठच्या दशकातील आहे. त्याअगोदर काही सिनेमा रसिक हे
मूकपटांपासून चित्रपट पाहत आले आहेत. कोल्हापूर मध्ये १९२० नंतर मूकपट आणि मग
बोलपट निर्मिती सुरू झाली. काही लोक चित्रपट पाहायला कोल्हापूर मधील त्यावेळच्या 'राजाराम' आणि आजच्या 'अयोध्या' थिएटरमध्ये जात
असत. आम्हाला नववी मध्ये गजानन जहागीरदार यांचा 'कलेचा प्रभाव' हा धडा
मराठीच्या युवकभारती पुस्तकात होता. हा धडा कोडोली हायस्कूल मधील सर्वात ज्येष्ठ
मराठी शिक्षक काईंगडे सरांनी शिकवला होता. सरांनी धडा शिकविण्यापूर्वी आम्हाला
मराठी चित्रपट इतिहास सांगून यातील आशय स्पष्ट केला होता. यात मूकपट, बोलपट, प्रभात कंपनी
यांची माहिती त्यांच्याकडून मिळाली होती.
कोडोलीत टुरिंग
टाँकिज सुरु झाली तो काळ साठच्या दशकातील आहे. १९५० मध्ये एस.टी बससेवा सुरू झाली
आणि कोल्हापूर शहरात जाण्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली. त्याअगोदर एक-दोन हाफकिन
खाजगी ट्रक वजा बस होती. गरजेपुरता प्रवास लोक करीत. रसिक हे या बसने जावून
कोल्हापूर शहरात सिनेमा आस्वाद घेत. १९५९ मध्ये वारणा सहकारी साखर साखर कारखाना
सुरु होऊन नवी काँलनीत उभी राहत गेली. कारखान्यात प्रारंभी बाहेरचे लोक
होते.त्यांनाही करमणूक साधन नव्हते. लोकांत चित्रपट आकर्षक वाढत जाण्याचा तो काळ.
१९६० नंतर दिगंबर कोडगुले यांनी एस.टी.स्टँन्ड जवळ 'मनिषा' ही पहिली टुरिंग टाँकिज सुरू केली.हे
कोडगुले एका चित्रपट निर्मितीचा प्रयोग करीत होते. 'पटलं तर व्हयं म्हणा' हा चित्रपट
त्यांनी करायला घेतला होता. याचे बरचसे बाह्यचित्रीकरण कोडोलीत झाले होते. हा
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयात गेला. कोल्हापूर मधील दत्ता बाळ यांनी
देवाची बदनामी होते, अशी भूमिका घेऊन न्यायालयात निर्माते आणि दिग्दर्शक यांना खेचले
होते. बरेच वर्षे ही केस चालली आणि मग काही काटझाट करून तो प्रदर्शित झाला.यात
पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले,अशा या कोडगुलेंनी पहिली पंधरा-वीस वर्षे गावात एकच टाँकिज
चालविले. त्यांचा उदय नावाचा धाकटा मुलगा हा आमचा कोडोली हायस्कूल मधील मित्र
होता. त्यांच्याकडून हे बरचसे समजले होते. 'मनिषा' हे थिएटर काही दिवस एच.के.पाटील यांनी
चालविले होते. यातून अनुभव घेऊन त्यांनी गावातून बाहेर पडण्याच्या मार्गावर 'राजेंद्र' नावाचे दुसरे
टाँकिज सुरु केले. पुढील तीन वर्षात आणि ऐंशी पूर्वी एम.आर. पाटील यांनी 'शिवानी' टाँकिज सुरू
करताना,नवे मशीन आणि
अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवून तांत्रिक दर्जा वाढवून टाकला. चौथे टाँकिज हे १९८५
मध्ये प्रकाश केकरे यांनी 'कस्तुरी' नावाने सुरू केले. नंतर एक व्हिडिओ सिनेमा थिएटर सुरू झाले.
काळाच्या ओघात हे चारही तंबू बंद पडले आणि 'मनिषा'ची जागा बांधीव 'वसंत चित्रमंदिर'ने घेतली.
आपल्याकडे
शुक्रवारी नवे चित्रपट लागण्याची पध्दत आहे. नवे चित्रपट हे शहरात प्रथम येत आणि
इतरत्र ते नंतर दाखविले जात. कोल्हापूरहून त्यावेळी 'पुढारी', 'सत्यवादी',' समाज' आणि 'नवसंदेश' ही वर्तमानपत्रे
प्रसिद्ध होत. यात एकपान चित्रपटांची जाहिरात राहत असे. बहुतेक तरुणवर्ग हे पान
आवर्जून पाहत असे. त्यांच्यात कोणता चित्रपट चांगला किंवा वाईट,अशी चर्चा होत
असे. नवा चित्रपट हा वर्षभरात कोडोलीत असे. कोडोलीचा बाजार हा गुरुवारी असल्याने, चित्रपट हा याच
दिवशी लागायचा. प्रेक्षक संख्या आणि आवड विचारात घेऊन मालक आठदिवस एक फिल्म रात्री
चालवत. बुधवारी सकाळी जुने रंगवलेले फलक हे चुना लावून स्वच्छ केलेले असत. यात
नव्या चित्रपटाची चाहूल दिसायची. नवा चित्रपट लागण्या अगोदर मोठा फलक पोस्टर्सनी
सजलेला असे. त्याची जागा टाँकिज बाहेर प्रवेशद्वारावर असे. लहान आकारातील
पोस्टर्सही गावात एक-दोन मोक्यांच्या ठिकाणी राहत. सायंकाळी हलगी वाजवत लहान
पोस्टर्स गावातील प्रमुख आणि गल्ल्यातून ते फिरविले जाई. गावातील मातंग समाजातील
हलगीवादक दोन मुले बरोबर घेऊन पार पाडत. गाव मोठे असल्याने, फेरी पूर्ण
होण्या अगोदरच हलगी उतरून जायची. वादक एखाद्या कोपऱ्याचा आश्रय घेऊन कागद-चघळा
पेटवून हलगी पुन्हा शेकून तयार करत आणि उर्वरित फेरी पूर्ण होई. लहानमुले ही छोटी
मिरवणूक आणि जाहिरात कुतूहलाने पाहत. आठदिवस जाहिरात अशाच पध्दतीने केली जात असे.
याचा परिणाम रात्री गर्दीत दिसून यायचा.
कोडोली
मधील सर्वात जुन्या 'मनिषा' मध्ये
सुरवातीला मध्यम स्वरूपाचे चित्रपट दाखविले जात. सत्तरच्या दशकात काही मराठी, हिंदी
चित्रपटांनी मात्र टाँकिज घरोघरी पोहचली. व्ही.शांताराम यांचा 'पिंजरा' हा
१९७२ मध्ये प्रदर्शित झाल्यावर काही दिवसात 'मनिषा' मध्ये
लागला होता. डिसेंबर थंडीत पंधरा दिवस हा चित्रपट कोडोलीत चालला. मी माझ्या आई आणि
काही शेजारी यांच्या बरोबर हा चित्रपट पाहिला होता. चित्रपटाचे कथानक, गाणी, संगीत, प्रभावी
होते. लावण्याची भुरळ फारच मोठी होती. 'पिंजरा'चे
काही बाह्य चित्रीकरण हे बोरपाडळे हाँटेल परिसरात झालेले होते, त्याची
चर्चा प्रेक्षकांत असे. या थिएटरमध्ये संस्मरणीय नोंद ही दादा कोंडके यांच्या 'पांडू
हवालदार'
चित्रपटाची झाली. कोडोलीत १९७५ मधील डिसेंबर
महिन्यात 'प्रभात' सर्कस
आली होती. सर्कशीचे सायंकाळी आणि रात्री असे दोन खेळ होत. याच दरम्यान 'मनिषा' मध्ये
'पांडू
हवालदार'
लागला. सर्कस पाहून प्रेक्षक चित्रपट पाहायला येत
किंवा चित्रपट पाहून सर्कस पाहायला जात. आसपासच्या खेड्यांतून लोक बैलगाडी, सायकली
घेऊन पाहायला यायचे. वाढती गर्दी विचारात घेऊन सर्कस आणि चित्रपट तीन खेळात
चालविले गेले. सर्कस आणि चित्रपट यांचा आनंद घेऊन लोक पहाटे घरी पोहचत. सर्कशीचा
सुध्दा मोठा तंबू होता. खेळ संपला की, बाहेर
मोठ्या टाँर्च मधून प्रखर प्रकाश आकाशात टाकला जायचा. हा प्रकाश पाच कि.मी. परिसरात
दिसायचा. प्रकाश मोठा नयनरम्य वाटायचा. या यशानंतर नवे चित्रपट आणण्यावर भर दिला
गेला. याच दरम्यान प्रदर्शित झालेला 'शोले' पंधरा
दिवसांहून अधिक काळ कोडोलीत तंबूत टिकून राहिला होता. यासाठी 70 एम
एम.च्या मापाने पडदा लावला गेला होता. १९७६ मध्ये एच.के.पाटील यांचे 'राजेंद्र' थिएटर
सुरु झाले. यात आम्ही 'दिवार' पाहिला
होता. अमिताभ बच्चन यांचे ऐंशीच्या दशकातील बहुतेक चित्रपट याच थिएटरमध्ये लागले
होते. मराठीतील निळू फुले,
ललिता पवार, रंजना
यांचा 'सासुरवाशीन' हा
चित्रपट बऱ्यापैकी चालला. डॉ. जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' पुढील
वर्षांत येथेच लागला होता. मी पहिल्यादिवशी चित्रपट पाहण्यासाठी गेलो. गर्दी तुरळक
होती म्हणून मालकांनी दुसऱ्या दिवशी हिंदी चित्रपट लावला. 'शिवानी' नावाचे
तिसरे थिएटरमध्ये गावात तळी नावाच्या भागात एम.आर.पाटील यांनी सुरु केले. यासाठी
नवा कोरा तंबू,प्रोजेक्टर
मशीन आणि साऊंड सिस्टीम आणली. 'हम किसेसे कम नही' या
चित्रपटाला घेऊन हे थिएटर दणक्यात सुरू केले गेले. लोक पडदा, साऊंड
सिस्टीम यासाठी हे थिएटर विसरणार नाहीत. शरद पिळगांवकर यांचा 'अष्टविनायक' चित्रपट
बऱ्यापैकी येथे चालला. 'सर्वसाक्षी' हा
सामाजिक चित्रपट आम्हाला येथे पाहता आला. जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा
यांचे सिनेमे येथेच जोरदार चालले. १९८५ मध्ये प्रकाश केकरे यांनी 'कस्तुरी' थिएटर
सुरू केले होते. येथे सलमान खान, अमीरखान,जुही चावला यांचे काही चित्रपट
लावले गेले. व्यावसायिक पातळीवर हे थिएटर लवकर बंद पडले.
बहुधा सर्वच थिएटरमध्ये रात्री
शो राहत. एखादे वेळी शाळेच्या गँदरिंगचा चित्रपट आणि डिमांड शो वगळता ही वेळ
सर्वांना सोयीची होती. पोस्टरवर रात्रौ ९.३० अशी वेळ दाखविली असली,तरी
सव्वा दहा ते उशिरा साडे दहा वाजता सुरू करून तो रात्री दिड पर्यंत संपून जाई. तंबूतील
चित्रपट पावसाळ्यात नसत. साधारणपणे दिवाळीपासून ते जूनच्या पहिल्या पावसापर्यंत
पाच एक महिने रोज रात्री शो व्हायचे.चित्रपटाची वेळ ठरवताना तरुण मुले, मुली,काँलेज
विद्यार्थी,महिला, शेतमजूर
यांचा विचार असे. कोडोली शेजारील जाखले, पोखले, बहिरेवाडी, नवे
पारगाव,
शहापूर अशा गावांतून लोक येत. यात काही सायकल
चालवत आणि चालतही येणारेही होते. महिला घरातील रात्रीची जेवणे आटोपून आणि
भांडीकुंडी साफ करून येत. शेतमजूर हे सायंकाळी दुसऱ्याच्या शेतातून काम करून आणि
येताना घरच्या जनावरांनसाठी वैरण घेऊन येत. हा वर्ग या तंबू चित्रपटांचा मोठा
चाहता होता. तिकीटदर हे नंतर दोन रुपये झाले होते आणि ते सर्वांना परवडणारे
होते.आम्ही अनेक मित्र रात्री वारणानगरहून जावून हे चित्रपट पाहत असू. परीक्षा
झाली की,
चित्रपट पाहायचा हा शिरस्ता होता. एरवी सुद्धा
चांगला चित्रपट लागला की जाणे व्हायचे. परंतु वडिलांची परवानगी ही प्रयत्नपूर्वक
मिळवावी लागत असे. आमच्या मागे राहणारे जे.बी.नाईक हे उत्साही असत. ते मध्यस्थी
करत. नाईक अण्णांच्या पुढाकारातून अनेक चित्रपट पाहता आले. सोबत त्यांची तिन्ही
मुले दिपक,
प्रकाश, बाळू
हे राहायचे. आमची मैत्री यातून अधिक बांधली गेली.
थिएटरमध्ये बैठक व्यवस्था भारतीय होती. मध्ये दोरी
लावून पुरुष आणि महिला अशा दोन व्यवस्था होत्या. भारतीय बैठकीसाठी लोक घरातून पोती, कांबळी
किंवा किलताण आणत. जे काही घेऊन येत नसत, ते
सरळ पायाखाली चप्पल घेऊन बसत. चित्रपट सुरु होण्या अगोदर लाँऊडस्पिकरवर पुंगी
मोठ्याने वाजत राही.यामुळे लोकांना चित्रपट आहे, असा
निरोप दिला जाई. पावणे दहानंतर पुंगी फक्त तंबूत वाजत राही. दहानंतर आवाज कमी करून
चित्रपट सुरु होण्याचा संकेत दिला जाई. प्रारंभी व्यावसायिक जाहिराती फिल्म आणि
नंतर फिल्म डिव्हिजन फिल्म दाखवून मग मूळ चित्रपट सुरू केला जाई. प्रथम दोन मोठी
रिळे संपवून मध्यंतर दहा-पंधरा मिनिटांचा राही. यात लोक थोडे बाहेर जावून
चणेफुटाणे खाऊन येत. चित्रपट सुरु असताना फिल्म तुटून रसभंग व्हायचा. प्रोजेक्टर
रुम बाहेर साठचा साधा बल्ब लागे. त्याचा प्रकाश पुरेसा नाही म्हणून काही हौशी
पडद्यावर बँटरीटाँर्च टाकत. काही शिव्या देत. दहा मिनिटात पुन्हा चित्रपट सुरू
करून तो ग्रिप घेई. सत्तर-ऐंशीच्या दशकात चित्रपटात आदर्शवाद होता. हिरोचे कष्ट
आणि हिराँईनचा छळ यावर चित्रपट बघताना लोक प्रतिक्रिया देत. चित्रपटाच्या शेवटी
मारामारी,
हिरोची फायटिंग याला लोक समररस होत, मार,बडव
अशा सूचना करत. शेवटी हिरो सर्व गुंडाना लोळवतो आणि पोलीस पकडण्यासाठी येत. 'समाप्त' अशी
अक्षरे दिसताच लोक बाहेर येऊन घरी जायला निघत. ही वेळ साधारणपणे दीडची असे. बाहेर
पडताना एकच मार्ग असे आणि अंतर ठेवून पुरुष व महिला बाहेर पडत. यात एकदा प्रेमिक
तरूण गुलाबी किंवा पिवळ्या अर्ध्या तिकिटावर प्रेमसंदेश लिहून एका छोट्या दगडात
गुंडाळून,
तो अपेक्षित मुलीकडे टाकून पुढे निघून जायचा.यात
काहींना पुढे यशही मिळून गेले. एकच गावात तीन थिएटर असल्याने, रात्री
अडीच पर्यंत रस्त्यावर वर्दळ राही. याच काळात साखर कारखाना सुरु असे. रात्री
बैलगाड्या,
ट्रक आणि ट्ँक्टर मधून ऊस वाहातूक सुरु असे. एखादा
ग्रुप रात्री ऊस खात घरी पोहचत असे. चित्रपट पाहून प्रभावी मुले शाळेत आपल्या
चित्रपट न पाहिलेल्या मित्रास सारांश स्वरूपात कथा सांगत,यात
एक वेगळी मजा होती.
चित्रपट हा समाजाचा आरसा किंवा
जे समाजात ते चित्रपटात,
अशी सुभाषित वाक्ये शाळा-काँलेजात सतत कानावर पडत
असत. कोडोली गाव आणि वारणा परिसरात हे तंतोतंत लागू झाले होते, हे
मलाही शालेय जीवनात पाहायला मिळाले. वारणा विद्यामंदीर मध्ये शिकत असताना केशभूषेत
'कोंबडा' फँशन
होती. राजेश खन्नाची वेषभूषा, केशभूषा, स्टाईल
ही तरुणामध्ये दिसत होती. राजेश खन्ना नंतर अमिताभ बच्चन यांचा काळ आला. 'दिवार','शोले' ने
पूर्ण परिमाण बदलून टाकले. बिटल्स, बेलबाँटम
पँन्ट नव्या फँशन पुढे आल्या. आमच्या कोडोली परिसरात हा बदल वेगाने आला. महागड्या टेरिलिन,टेरिकाँट
कपड्याला एस कुमार शुटिंग- शर्टिंगचा मध्यम पर्याय उपलब्ध झाला. तरूण आणि विशेषतः
नव्याने काँलेजला जाणारी मुले ही नव्या रूपात वावरु लागली. केशभूषा ही बिटल्स
वळणावर गेल्याने,
अनेकजण खिशात छोटा कंगवा ठेवू लागले. याच काळात
काही शाळा-काँलेजात एन.सी.सी.असे. यात सहभागी मुलांना बिटल्स कट ठेवण्याची मुभा
नव्हती. नव्या फँशन मधून नवी टेलरिंग व्यवस्था आली. तो काळ कपडे विकत घेऊन
शिवण्याचा होता. त्यामुळे टेलरिंग व्यवसाय वधारून गेला. हाच बदल केशकर्तनालयात
दिसून येऊ लागला. नव्या फँशेनमुळे या दुकानाचा चेहरा बदलून गेला. तरूण दुकानात
यावेत म्हणून आकर्षक फर्निचर मांडले गेले. रेडिओ, टेपरेकॉर्डर
यातून गाणी ऐकवणे,
क्रिकेट समालोचन सुरु ठेवणे, हे
नवे बदल दुकानात आले. याचा फायदा अर्थात कारागिरांना होत गेला. दिवसाकाठी काही काम
असो नसो,तरूण
ओळखीच्या दुकानात जावून आरशासमोर उभे राहत. फँशन बदलाचा एवढा फायदा तरुण मुली घेऊन
शकत नसत. घरातील सौंदर्य प्रसाधन वापरून वाटचाल पुढे जात राहिली. हा काळ
ब्युटीपार्लर सुरू होण्यापूर्वीचा आहे. साधीराहणी आणि नाकासमोर चालणे ही आदर्शवादी
कल्पना समस्त स्त्री वर्गावर प्रभाव ठेवून होती.घरचे कार्यक्रम, शाळा-काँलेजातील
स्नेहसंमेलनात फारतर रंगीत कपडे आणि उपलब्ध सौंदर्य प्रसाधने वापरण्याची संधी तरुण
मुलींना मिळत राहिली. नव्वदच्या दशकात खूप मोकळेपणा मुलींना अनुभवता आला. आज केवळ
चित्रपटच नाही तर समाजमाध्यमे, वेब यांनी फँँशन आणि सौंदर्य यांची व्याख्या बदलून
टाकली आहे. परंतु हे सिंहावलोकन करताना चित्रपटांचे फँशन योगदान अधोरेखित करून
ठेवावे लागते.
'तंबूंतील भावविश्व' हा
विषय साठ ते ऐंशीच्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा भावनिक आठवणींचा मोठा
ठेवा आहे. हा कालावधी खूपच मोठा आहे. यातील प्रत्येकाचे अनुभव वेगळेही असतील.
परंतु समानता ही की,
सर्वांचे भावविश्व खुलवले गेले. गेल्या चाळीस
वर्षात भावविश्व खुलविणारी तंबू थिएटर व्यवस्था आता इतिहासात जमा आहे. घरोघरी केबल,टि.व्ही, डिश
यांनी करमणूक,
फँशन यांचे परिमाण बदलून टाकले. आता होम थिएटरचा
जमाना येऊन एक दशक ओलांडले आहे. तंबू ते होम थिएटर हा प्रवास मनोरंजक, उत्साही
असाच आहे. या कालखंडाचा सहप्रवासी होताना असंख्य आठवणी बरोबर आहेत. त्यांना
शब्दबध्द करणे आवश्यक होते.मी हा एक प्रयत्न करून पाहिला आहे.
डॉ. संजय रत्नपारखी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा